मुंबई - भांडुप पश्चिमेतील सह्याद्री विद्यामंदिर या खासगी शाळेत गुरुवारी १६ विद्यार्थ्यांना खिचडीची बाधा झाली. त्यानंतर, अन्न व औषध प्रशासन विभागाने तेथील अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्याचा अहवाल येणे बाकी असले, तरी तपासणी प्रक्रियेदरम्यान लिंगेश्वर महिला बचत गटाकडे परवानाच नसल्याची धक्कादायक माहिती एफडीएच्या चौकशीत समोर आली.एफडीएचे सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी सांगितले की, कंत्राटदाराकडे परवाना नसल्याचे चौकशीतून समोर आले. अन्नाच्या नमुन्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, त्यानंतर नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान खिचडी बाधाप्रकरणी १६ विद्यार्थ्यांसह शिक्षिकेला मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी शुक्रवारी तीन विद्यार्थी आणि शिक्षिकेवर उपचार सुरू असून, अन्य विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या डॉ. उषा मोहप्रेकर यांनी दिली.