आता मुंबईच्या झोपडपट्टी स्वच्छतेसाठी कंत्राटदार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 09:44 AM2023-12-22T09:44:43+5:302023-12-22T09:46:10+5:30
मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये सामाजिक संस्थांकडून होणारे स्वच्छतेचे काम आता कंत्राटदारांच्या माध्यमातून केले जाणार आहे.
मुंबई : मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये सामाजिक संस्थांकडून होणारे स्वच्छतेचे काम आता कंत्राटदारांच्या माध्यमातून केले जाणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. घरोघरी कचरा जमा करण्यापासून ते नालेसफाईपर्यंतची सर्व कामे एकाच कंत्राटदाराला दिली जाणार आहेत. स्वच्छतेचे काम परिणामकारकरीत्या होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईच्या एकूण वस्त्यांपैकी सुमारे ५० टक्के वस्ती झोपडपट्टी भागात आहे. झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी दहा वर्षांपूर्वी स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान सुरू करून सामाजिक संस्थांना घरोघरी कचरा जमा करण्याचे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे झोपडपट्ट्यांमधील कचरा कमी होण्यास मदत झाली होती. शिवाय अनेकांना रोजगारही मिळाले होते.
झोपडपट्टीतील नाल्यांची स्वच्छता, घरोघरी कचरा जमा करणे आणि स्वच्छतेबाबतची पुढील आवश्यक कार्यवाही त्यांच्याकडून केली जाईल. यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंत्राटदाराला जाब विचारणेही शक्य होईल. त्यामुळे झोपडपट्ट्यांची स्वच्छता परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. आगामी काळात जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात काम करून कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.- डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
सर्वसमावेशक उपक्रम राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी संपूर्ण विभाग-झोपडपट्टीची जबाबदारी एकाच कंत्राटदारावर सोपवली जाईल.
यामुळे नागरिकांचा राहता परिसर स्वच्छ होणार आहे.