लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नौदलासाठी युद्धसाहित्याची निर्मिती करणाऱ्या माझगाव गोदीमध्ये सध्या ‘कंत्राटदारराज’ सुरू असल्याची टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. येथील बहुतांश काम निविदा पद्धतीने कंत्राटदारांना देण्यात आले आहे. कॉस्ट कटिंगच्या नावाखाली अकुशल कामगारांचा भरणा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
संरक्षण दलासाठी पाणबुड्या, लढाऊ जहाजे किंवा अन्य युद्धसाहित्याची निर्मिती माझगाव गोदीमध्ये केली जाते. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने या कामात गुणवत्ता आणि गोपनीयता महत्त्वाची असते. मात्र, गेल्या काही वर्षांत येथे आऊटसोर्सिंग मोठ्या प्रमाणात वाढले असून, बहुतांश काम निविदा पद्धतीने कंत्राटदारांच्या हाती देण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.
या कंत्राटदारांवर तेथील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नाही. त्यामुळे ते अकुशल कामगारांकरवी स्वस्तात कामे करून घेतात. परिणामी, जहाज बांधणीवेळी अनेक अपघात घडले असून, यात काही कामगारांना आपला जीवही गमवावा लागला आहे. मात्र, अशी प्रकरणे जाणीवपूर्वक दडवून ठेवली जातात असा आरोपही सावंत यांनी केला.
दुसरीकडे, आयटीआय किंवा अन्य औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली जाते. हे कामगार आठ-दहा वर्षांत कुशल झाले की त्यांना कायम करावे लागू नये यासाठी थेट नोकरीवरून काढून टाकले जाते. अलीकडे ४१६ उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या, परंतु त्यातील केवळ सात जणांना कायम करण्यात आल्याची माहिती अरविंद सावंत यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी माझगाव गोदीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
..................
आऊटसोर्सिंग वाढले...
माझगाव गोदीचे विद्यमान अध्यक्ष नारायण प्रसाद यांनी परभार स्वीकारल्यानंतर गेल्या १५ महिन्यांमध्ये आऊटसोर्सिंग वाढले आहे. सध्या तेथे ३ हजार कायम तत्त्वावरील कर्मचारी असून, तब्बल साडेतीन हजार कर्मचारी आऊटसोर्स केले आहेत. अध्यक्षांनी कारभार हाती घेतल्यानंतर एकदाही कर्मचारी संघटनांसोबत बैठक घेतलेली नाही, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला.
....................
कॉस्ट कटिंगच्या नावाखाली अकुशल कामगारांकडून काम करून घेतात. त्यांनी अर्धवट सोडलेले काम कायम तत्त्वावरील कर्मचारी पूर्ण करतात. त्याचा त्यांना ओव्हरटाइम दिला जातो. मग यात पैशांची बचत कुठे झाली? देशाच्या सुरक्षेसोबत तरी असा घाणेरडा खेळ करू नका.
- अरविंद सावंत, खासदार, शिवसेना