कामगार मृत्यूप्रकरणी कंत्राटदाराची कसून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 06:15 IST2025-03-10T06:15:47+5:302025-03-10T06:15:55+5:30
पोलिस म्हणतात, निष्काळजीपणा आढळल्यास त्वरित गुन्हा

कामगार मृत्यूप्रकरणी कंत्राटदाराची कसून चौकशी
मुंबई : चार कंत्राटी कामगारांच्या मृत्यूप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. आम्ही कामगार कंत्राटदाराला बोलावून त्याची चौकशी केली. त्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही सर्व संबंधितांना चौकशीसाठी बोलावणार आहोत, असेही पोलिसांनी सांगितले. चौकशीअंती निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
इमारतीच्या तळघरातील रिकाम्या पाण्याच्या टाकीत हे कामगार साफसफाईसाठी उतरले होते. टाकी बराच काळ वापरात नव्हती. या कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने देण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलिस तपास करत आहेत.
'बिस्मिल्लाह स्पेस' ही नागपाडा येथील मस्तान तलावाजवळील बांधकामाधीन इमारत आहे. ही ४० मजल्यांची इमारत आहे, असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले. इमारतीचे ३० मजले बांधण्यात आले आहेत. पूर्वी आबिद इमारत आणि हाशिम इमारत या दोन निवासी इमारतींचा पुनर्विकास होणार होता. कोविडपूर्वी, प्रकल्पाचा पुनर्विकास करण्यासाठी दोन ते तीन विकासकांच्या गटाने रहिवाशांशी संपर्क साधला होता. त्यांनी नवीन प्रकल्पात दोन्ही जुन्या इमारतींच्या बदल्यात एकच बहुमजली इमारत बांधण्याचा विकासकाचा प्रकल्प होता. मात्र, त्याने सुरुवातीच्या टप्प्यातच हा प्रकल्प सोडून दिला आणि नंतर तो अक्रम निर्बाण गटाने ताब्यात घेतला, असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले. प्रकल्पाचे बांधकाम सध्या जोरात सुरू आहे. पुढील वर्षी फ्लॅटचा ताबा भाडेकरूंना दिला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका रहिवाशाने दिली.
सहा महिन्यांपूर्वीच आला होता मुंबईत
मृतांपैकी हसीबुल शेख (१९) हा दहावी पास आहे. सहा महिन्यांपूर्वीच तो मुंबईत आला होता. पाच महिन्यांपासून या इमारतीत कंत्राटावर काम करीत होता.
त्याचे वडील शरफुल शेख म्हणाले, त्यांना एक मुलगी आणि दोन मुले -हसीबुल आणि अशद आहेत. हसीबुल मामासोबत या ठिकाणी काम करत होता. मामाकडूनच या दुर्घटनेची माहिती आम्हाला मिळाली.
शरफुल हे वसईजवळील नायगाव येथे काम करत होते. त्याच्या नातेवाइकाकडून घटनेबद्दल फोन आल्यानंतर ते नागपाडा येथे पोहोचले, असे त्यांनी सांगितले.
कुटुंबासह ईद साजरी करण्याचे स्वप्न अपूर्ण
मूळचा मुर्शिदाबादचा रहिवासी असलेल्या झियाउल शेखचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तो सुतारकाम करत होता. त्याला दोन मुली आहेत. आठ वर्षांची मुस्कान आणि १० वर्षांची जिनिया. त्या मुर्शिदाबादला राहतात.
तो 3 मार्चच्या अखेरीस त्याच्या कुटुंबासोबत ईद साजरी करण्यासाठी गावी जाणार होता, असे त्याचा मोठा भाऊ मुनीरुल शेख (४०) याने सांगितले.
मुनीरुल दुसऱ्या ठिकाणी सुतार म्हणून काम करत होता, असे त्याने सांगितले. झियाऊल गावी येणार म्हणून कुटुंबीय आनंदात होते. मात्र त्यापूर्वीच त्याच्या मृत्यूची बातमी आली.
आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात नेमके काय घडले आहे? टाकीत नेमका कोणता वायू होता? याची फॉरेन्सिक चौकशी करण्यात येत आहे. आमचे पथक तपास करीत आहे. वस्तुस्थिती लवकरच उजेडात येईल - संजय काटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जे जे मार्ग पोलिस ठाणे