‘त्या’ इमारतींच्या बांधकामासाठी याच महिन्यात नेमणार कंत्राटदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:06 AM2020-01-05T01:06:25+5:302020-01-05T01:06:28+5:30
मेट्रो-३ मार्गिकेच्या कामाला गती देण्यासह या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या इमारतींच्या पुनर्बांधणीचेही काम गतीने होण्याच्या दिशेने मेट्रो प्रशासनाने पावले उचलली आहेत.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या कामाला गती देण्यासह या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या इमारतींच्या पुनर्बांधणीचेही काम गतीने होण्याच्या दिशेने मेट्रो प्रशासनाने पावले उचलली आहेत. बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी इमारती बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. काळबादेवी येथील के-३ या पहिल्या पुनर्विकास इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट याच महिन्यामध्ये देण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) घेतला आहे. बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनासाठीची ही पहिलीच इमारत आहे.
मेट्रो-३ मार्गिकेमुळे गिरगाव आणि काळबादेवी परिसरातील ७१२ कुटुंबीय बाधित होत होते, या कुटुंबीयांचे परिसरामध्येच पुनर्वसन करण्याची योजना एमएमआरसीएलने आखली आहे. काळबादेवी येथील इमारतींचे जानेवारीमध्ये कंत्राट दिल्यानंतर गिरगावमधील जी-३ इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट मे २०२०मध्ये देण्यात येणार असल्याचे एमएमआरसीएलच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
एमएमआरसीएलने काळबादेवी आणि गिरगाव येथील सहा भूखंडांना एकत्रित करून पुनर्विकास करण्याची योजना बनवली आहे. यानुसार काळबादेवी येथील के-१, के-२, के- ३, आणि गिरगाव येथील जी-१, जी-२ आणि जी-३ भूखंडांना जोडण्यात येणार आहे. के-१, के-३ आणि जी-३ या भूखंडांवर रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या भूखंडांवर काळबादेवी व्यावसायिक केंद्र, काळबादेवी हाईट्स, गिरगाव हाईट्स या नावाने पुनर्विकास योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
>मेट्रो-३ मार्गिकेमध्ये बाधित होत असलेल्या काळबादेवी-गिरगाव येथील ज्या रहिवाशांना ज्यांचे तीनशे चौरस फुटांचे घर आहे त्यांना दुप्पट आकाराचे घर मिळणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही मेट्रो-३ मार्गिका भूमिगत ५५ किलोमीटर लांबीची असून आतापर्यंत ७३ टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे.