ठेकेदार लावतात 40 टक्के कमी खर्चाची बोली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 05:39 AM2021-03-06T05:39:07+5:302021-03-06T05:39:22+5:30
स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर : कामाच्या दर्जाबाबत सदस्यांनी व्यक्त केला संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जलवाहिन्यांची गळती व अचानक निघणाऱ्या दुरुस्तीच्या संभाव्य कामासाठी कंत्राट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर प्रशासनाने शुक्रवारी मांडला;मात्र या कामासाठी पालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा चक्क ३३ ते ३९ टक्के कमी खर्चात काम करण्याची तयारी ठेकेदारांनी दाखविली आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत स्थायी समिती सदस्यांनी साशंकता व्यक्त केली; परंतु कामाच्या दर्जाबाबत तडजोड केली जाणार नाही, अशी हमी प्रशासनाने दिल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील तीनशे मि.मी. व त्यावरील आकाराच्या जलवाहिन्यांची गळती, चेंबरची बांधकामे, जलवाहिन्या व नियंत्रण झडपांच्या कामाचे कंत्राट देण्यात येणार आहे. ही कामे भविष्यातील संभाव्य कामे असल्याने गळती दाखवून बिल बनवली जात नाहीत ना? अशी शंका भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केली. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या या चार प्रस्तावांमध्ये ३३ ते ३९ टक्के कमी दराची बोली ठेकेदारांनी लावल्याबाबत आश्चर्य व्यक्त करीत एवढ्या कमी खर्चात काम होणार तरी कसे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही कामाचा दर्जा कसा राखणार? याबाबत खुलासा करण्यास प्रशासनाला सांगितले.
१४ कोटी ५३ लाखांच्या
प्रस्तावाला मंजुरी
मात्र इ निविदा मागविण्यात येत असल्याने कोणी किती बोली लावावी? हा त्यांचा अधिकार आहे;
मात्र कमी बोली लावणाऱ्या ठेकेदारांकडून त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत हमी घेतली जाते. जलवाहिन्यांच्या दुरुस्ती अथवा अचानक जलवाहिनी फुटल्यास तातडीने दुरुस्तीसाठी आस्थापनावर एजन्सी असणे आवश्यक आहे. त्यामुळे ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येत असून, काम प्रत्यक्ष केल्यानंतरच त्यांना मोबदला दिला जातो, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर १४ कोटी ५३ लाखांच्या या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली.
...म्हणून ठेकेदार लावतात कमी बोली
nकोविडकाळात मुंबईत तब्बल दहा महिने लॉकडाऊन कालावधी सुरू राहिला. या काळात अनेकांच्या हाताचे काम गेले. त्यामुळे काम मिळविण्यासाठी ठेकेदार कमी बोली लावू लागले आहेत. ३० ते ४० टक्के कमी बोली लावणाऱ्या ठेकेदारांच्या कामाबाबत स्थायी समिती सदस्यांनी शंका व्यक्त केली असता प्रशासनाने असे स्पष्टीकरण दिले.
nपांजरापूर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या मागील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी पालिकेने अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा २९ टक्के कमी खर्चात काम करण्याची तयारी ठेकेदाराने दाखविली आहे.
nयाबाबत सदस्यांनी सवाल उपस्थित केला असता, लॉकडाऊन काळात मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचा वापर झाला नाही. त्यामुळे काम
मिळवण्यासाठी कमी बोली लावत असलो तरी कामाच्या दर्जात तडजोड करणार नाही, अशी हमी ठेकेदारांनी दिल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.