कोट्यवधींचा भ्रष्टाचार; कामगारांचा आर्थिक छळ करत असल्याचे उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील स्मशानभूमींमध्ये मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसह उर्वरित कामांसाठी नेमलेल्या कामगारांचा कंत्राटदारांकडून आर्थिक छळ सुरू आहे. कारण येथील कामगारांना कंत्राटदारांकडून भारत सरकारच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन दिले जात नसल्याचे चित्र आहे. कामगाराला मिळणाऱ्या २३ हजारांपैकी १० हजार कंत्राटदारांच्या खिशात जात असून, मेहनत करणाऱ्या कामगाराच्या हाती केवळ १३ हजार पडत आहेत. परिणामी मृतदेहांच्या टाळूवरचे लोणीही कंत्राटदार खात असून, या प्रकरणांत कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत आहे.
मुंबई महापालिकेने स्मशानभूमीतील मृतदेहांवरील अंत्यसंस्कार करण्यासाठी कंत्राटदार नेमले आहेत. कंत्राटदारांनी लाकडे जमा करणे, अंत्यसंस्कार अशी कामे करण्यासाठी कामगार नेमले आहेत. आता भारत सरकारच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे प्रत्येक कामगाराला ठरावीक वेतन मिळाले पाहिजे, असे ठरले आहे. कंत्राटदार आपण केलेल्या कामानुसार आपल्या कामाची बिले महापालिकेला सादर करतो. त्यानुसार, मुंबई महापालिका प्रत्येक कामगारामागे कंत्राटदाराकडे महिन्याला २३ हजार रुपये पगार जमा करत असतो. मध्यंतरी येथील कामगारांचे पगार होत नाहीत; असा मुद्दा ऐरणीवर आला होता. परिणामी मुंबई महापालिकेने त्यानंतर थेट कामगारांच्या खात्यात पगार जमा करणे सुरू केले. मात्र यातही कंत्राटदार गैरव्यवहार करत आहेत, असे स्वाभिमानी भारतीय पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुश कुराडे यांनी सांगितले.
कामगारांच्या बँकेच्या पास बुकपासून इतर गोष्टी कंत्राटदाराकडे आहेत. कंत्राटदार जेव्हा पालिकेकडे आपल्या कामाचे सादरीकरण करतो तेव्हा कामगारांना नियमानुसार पगार दिला जातो. सगळ्या सोयी दिल्या जातात, असे दर्शवितो. प्रत्यक्षात तसे काहीच नसते. कामगाराला तेवढा पगार मिळत नाही. कामगाराला २३ हजार पगार दिला जातो, असे सादरीकरण कंत्राटदार महापालिकेकडे करतो. पण कामगारांना केवळ १३ हजार मिळतात. उरलेले १० हजार कंत्राटराच्या खिशात जातात; जे पैसे कामगाराच्या मेहनतीचे, हक्काचे असतात.
* पेपर वर्क क्लिअर; खरी अडचण येथेच
मुळात अशा प्रकरणात कागदोपत्रांवरील व्यवहार खूपच सावधपणे केले जातात. त्यामुळे गैरव्यवहार समोर येत नाहीत. पण जर कामगारांना याबाबत विचारले तर अडचणी लक्षात येत असल्याचे समाेर आले आहे.
* चाैकट
मुंबई महापालिकेने मृतदेहांवरील अंत्यसंस्कार करण्यासाठी २५ ते ३० कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. आणि किमान पाचशे कामगार कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहेत.
-------------------------------