Join us

ठेकेदाराची कुंडलीच उपलब्ध होणार

By admin | Published: May 23, 2017 2:34 AM

कित्येक वर्षे महापालिकेत दुकान थाटून बसलेल्या ठेकेदारांच्या मुसक्या आवळणे प्रशासनाला महागात पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कित्येक वर्षे महापालिकेत दुकान थाटून बसलेल्या ठेकेदारांच्या मुसक्या आवळणे प्रशासनाला महागात पडले. मात्र यातूनही धडा घेऊन ठेकेदारांना त्यांचा कार्य अहवाल त्यांच्या यूआयडी क्रमांकाशी संगणकीय प्रणालीमध्ये जोडण्याचे एका परिपत्रकाद्वारे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ठेकेदाराची कुंडलीच एकप्रकारे उपलब्ध होणार आहे. परिणामी दुसऱ्या विभागात निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या ठेकेदाराचा पर्दाफाश होणार आहे. गेल्या दोन वर्षांत काही घोटाळे उघड झाल्यानंतर पारदर्शक कारभाराची शपथ घेणाऱ्या प्रशासनाने ही पावले उचलली आहेत.जल अभियंता, मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन अशा नागरी सेवांची खाती बदलली तरी काम करणारा ठेकेदार एकच असतो. गेल्या काही वर्षांमध्ये ठेकेदारांचे सिंडिकेट महापालिकेत तयार झाल्याने प्रत्येक विभागाचे कंत्राट त्याच ठेकेदाराच्या खिशात जात असते. मात्र रस्ते आणि नालेसफाई घोटाळ्यानंतर प्रशासनाने ठेकेदारांच्या मुसक्या आवळण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु याचे उलट परिणाम होऊन नालेसफाई व गाळ उचलण्यासाठी ठेकेदार मिळेनासे झाले. त्यामुळे ठेकेदारांचा बोगस कारभार उघड करण्यासाठी प्रशासनाने नामी शक्कल लढवली आहे.आतापर्यंत ठेकेदाराच्या कार्याचा अहवाल त्या विभागातच ठेवण्यात येत होता. त्यामुळे एखाद्या खात्याचे काम निकृष्ट दर्जाचे करूनही त्या ठेकेदाराला दुसऱ्या खात्याचे काम बऱ्याच वेळा मिळत असे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना हद्दपार करण्यासाठी अखेर सर्व ठेकेदारांच्या कामांचे अहवाल त्यांच्या ‘यूआयडी’ क्रमांकाशी संगणकीय प्रणालीमध्ये जोडण्याचे परिपत्रक आयुक्त अजय मेहता यांनी काढले आहे. विशेष म्हणजे ही माहिती अद्ययावत झाल्याशिवाय ठेकेदाराला त्याचे पेमेंट मिळणार नाही, अशीही तरतूद यात करण्यात आली आहे. यामुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.गुणवत्ता आणि अचूकता वाढणार१एखाद्या अधिकाऱ्याची वा अभियंत्याची बदली किंवा निवृत्ती झाली तर त्या जागेवर येणाऱ्या नवीन व्यक्तीला संबंधित कामांची माहिती सहजपणे उपलब्ध होऊ शकणार आहे.२कोणत्याही ठेकेदाराला नवीन कामाचे कंत्राट देताना त्याच्या यूआयडीशी संलग्न असणारी माहिती तपासून व त्याची नोंद घेऊन निविदाविषयक कार्यवाही करण्यात येणार आहे.३सुधारणांमुळे ठेकेदाराद्वारे करण्यात येणारी कामे आणि निविदाविषयक प्रशासकीय कामे ही अधिक जलद गतीने होण्यासोबतच गुणवत्ता, पारदर्शकता आणि अचूकता वाढण्यास मदत होईल, असा पालिकेचा दावा आहे. ठेकेदारांना मिळतेय अभयमहापालिकेच्या अंतर्गत संगणकीय प्रणालीमध्ये प्रत्येक ठेकेदाराच्या ‘यूआयडी’ला आतापर्यंत केवळ कामाचा आदेश क्रमांक आणि कंत्राटकामाचे मूल्य एवढीच माहिती उपलब्ध होती. त्याचबरोबर ठेकेदारांद्वारे केल्या जाणाऱ्या कामांचा गुणवत्ता अहवाल हा यापूर्वी केवळ संबंधित खात्याच्या/विभागाच्या स्तरावरच जतन केला जात होता. यामुळे ठेकेदारांनी केलेल्या कामांच्या गुणवत्तेचा अहवाल इतर खात्यांना सहजपणे उपलब्ध होत नव्हता. असा अहवाल मिळवण्यासाठी बराच वेळ जात असे.३१ मेपासून नवीन बदलठेकेदारांच्या कामांविषयीचे गुणवत्ता अहवाल ठेकेदारांच्या ‘यूआयडी’ क्रमांकाला ३१ मे २०१७ पासून संगणकीय पद्धतीने जोडले जाणार आहेत. आता ठेकेदारांची व संबंधित कामांची माहिती संगणकीय पद्धतीने अंतर्गत स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी मोठे बदल करण्यात येणार आहेत. या सुधारणांमध्ये प्रत्येक ठेकेदाराद्वारे करण्यात येणाऱ्या कामांची माहिती त्याच्या यूआयडीला जोडण्यात येणार आहे. यामध्ये कामाविषयीच्या संख्यात्मक व गुणात्मक माहितीचा समावेश असणार आहे.ठेकेदारांची नोंदणीविषयक माहिती, कंत्राटाची कामांनुसार रक्कम, कामांच्या प्रगतीचा अहवाल, कामांचा गुणवत्ता अहवाल, दिलेल्या रकमेची माहिती, दंड झाला असल्यास त्याविषयीची माहिती, कामचुकारपणा किंवा निकृष्ट दर्जाच्या कामाची माहिती, ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश झाला असल्यास त्याबाबतची माहिती उपलब्ध असणार आहे.ठेकेदाराविषयी माहिती महापालिकेच्या अंतर्गत संगणकीय प्रणालीमध्ये वेळोवेळी अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही माहिती जोपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये भरली जाणार नाही, तोपर्यंत ठेकेदारांच्या संबंधित बिलाची रक्कम दिली जाणार नाही, अशा पद्धतीने ही संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.अधिकाऱ्यांवरही जबाबदारीठेकेदारांनी केलेल्या कामाविषयीची माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्याची जबाबदारी ही साहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर असणार आहे. याबाबत मान्यता देण्याची जबाबदारी ही संबंधित विभागप्रमुखांची असणार आहे.