मुंबई - कर्मचाऱ्यावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एअर इंडियाच्या ग्राऊंड स्टाफ व कमर्शियल विभागातील सुमारे 400 कर्मचारी बुधवारी (7 नोव्हेंबर) रात्रीपासून संपावर गेल्याने मुंबई विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानांच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ऐन दिवाळीत हा प्रकार घडल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एअर इंंडियाशी संलग्न असलेल्या एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस ( एआयएटीएस) मध्ये हे कर्मचारी काम करत आहेत.
कर्मचाऱ्यांचे किरकोळ गोष्टीवरुन निलंबन, कामावरुन कमी करणे, मुलभूत सुविधा नाकारणे, कामगार संघटना करताना अन्यायकारक अटी लादणे, बोनस न देणे अशा विविध कारणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते, या संतापाचा स्फोट होऊन कर्मचारी संपावर गेल्याची माहिती या संपाला पाठिंबा दिलेल्या भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष चाळके, चिटणीस संजय कदम व संतोष कदम यांनी दिली. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी दिवाळीमध्ये सण साजरा करण्याऐवजी संपावर जावे लागते हे दुर्देवी आहे असे ते म्हणाले. प्रशासनाने कर्मचाऱ्याच्या मागण्यांची त्वरित दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा गंभीर परिस्थिती उद्भवण्याचा इशारा संजय कदम यांनी दिला आहे.
दिवाळीच्या सुटीमुळे मुंबई बाहेर फिरायला जाणाऱ्यांचा कल विमानाने जाण्याकडे असतो मात्र नेमका याच वेळी संप झाल्याने प्रवाशांना खोळबून राहावे लागले. मुंबई विमानतळावरील परिस्थितीमुळे काही विमानांना विलंब झाला आहे. विमानसेवेवर आणखी कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये प्रयत्न सुरु असून घरी असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जात असून प्रवाशांना होणारा त्रास कमीत कमी व्हावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली. या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या 1. व्यवस्थापनाद्वारे होणारी सततची त्रासदायक व अपमानास्पद वागणूक बंद करावी
2. वर्षानुवर्षे रखडलेली पगारवाढ त्वरित करावी
3. बोनस दिला जात नाही तो नियमितपणे व वेळेवर द्यावा वाहतुक सुविधा दिली जात नाही ती दिली जावी
4. महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले जाते ते प्रकार बंद करावेत
5.अवैध पद्धतीने कामगारांना कामावरुन काढून टाकणे बंद करावे
6. नविन नियुक्ती न करता निवृत्त झालेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाते, असे प्रकार बंद करावेत