मुंबई: ‘महाविकास आघाडीत अंतर्विरोध, अंतरपाट वगैरे काहीही नाही. आम्ही वरमाला घातल्या आहेत. संसार सुखाने चालला आहे. ही खिचडी वगैरे काही नाही. हे देशातील तीन प्रमुख पक्षांचे सरकार आहे आणि पाच वर्षे हे सरकार अढळ आहे’, असा दावा शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला.पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पारनेरचे नगरसेवक फूट प्रकरण आदी मुद्यांवरून शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याचे वृत्त आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, महाविकास आघाडीत खटके वगैरे काहीही उडालेले नाहीत. तिन्ही पक्ष समन्वय साधून काम करत आहेत. करोनामुळे थोडासा संपर्क आणि संवाद कमी झाला असला तरी एकमेकांशी चर्चा करूनच निर्णय घेतले जात आहेत. मुख्यमंत्र्यांचे सर्व बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष आहे.पारनेरचा मुद्दा स्थानिकपारनेरच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. हा स्थानिक स्तरावरचा विषय होता, तो त्या पातळीवरच संपायला हवा होता.आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही.त्यामुळे आता हा विषय आता चर्चेत येऊ नये, असं मला वाटतं. स्थानिक राजकारणाचा भाग होता. यापुढे असा निर्णय घेताना एकमेकांशी बोलावं. काही गोष्टी अनावधनाने घडत असतात. त्या प्रसंगाचं काय होईल याची कल्पना नसते, असे ते म्हणाले.
अंतर्विरोध, अंतरपाट नाही; आम्ही वरमाला घातल्यात! धुसफुशीवरून संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 6:09 AM