खरे कोण, परमबीर सिंग की सचिन वाझे?; पत्रांमधील विसंगतीनं संशय वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 02:26 AM2021-04-09T02:26:10+5:302021-04-09T07:21:30+5:30
‘लेटर बाॅम्ब’ने उडवली खळबळ : आरोपांसंदर्भातील दोघांच्या पत्रांत मोठी विसंगती
- जमीर काझी
मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग आणि एनआयएच्या अटकेतील निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्या ‘लेटर बॉम्ब’ने पोलीस दलाबरोबर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असताना त्यांच्या आरोपातील विसंगती चर्चेचा नवीन विषय बनला आहे. दोघांनीही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असले तरी त्यामध्ये मोठी विसंगती आहे. त्यामुळे कोणाचे आरोप खरे आणि कोण खोटे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर करण्यात आलेल्या आराेपात तथ्य नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. एकवेळ त्यांचे म्हणणे ग्राह्य धरले तरीही परमबीर सिंग खरे बोलत आहेत, की सचिन वाझेने जे सांगितले ते खरे आहे, हे केंद्रीय तपास यंत्रणेच्या तपासानंतरच समाेर येणार आहे.
परमबीर सिंग यांनी २० मार्चला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे यांना प्रत्येक महिन्याला १०० कोटी वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा दावा केला असताना बुधवारी व्हायरल झालेल्या वाझेच्या कथित पत्रामध्ये वसुलीच्या टार्गेटचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नाही. शिवाय त्यांनी दिलेल्या कालावधीमध्ये फरक असल्याने समाेर आले आहे.
दोघांच्या पत्रांमधील प्रमुख विसंगत बाबी अशा
परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेला फेब्रुवारीच्या मध्यावर बोलावून महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचे नमूद केले आहे. वाझेच्या पत्रामध्ये या रकमेबद्दल कसलाही उल्लेख नाही, तर प्रत्येक बारमधून सरासरी तीन ते साडेतीन लाख वसूल करावे, असे म्हटले आहे शिवाय जानेवारीत गृहमंत्र्यांना भेटल्याचे नमूद केले आहे.
वाझेने गेल्यावर्षी जुलै/ऑगस्टमध्ये अनिल देशमुख यांनी दाेन कोटींची मागणी केली होती, असे म्हटले आहे, तर परमबीर सिंग यांच्या पत्रात मात्र त्याचा उल्लेख नाही.
वाझेने अनिल परब यांनी ‘सैफी’च्या ट्रस्टीकडून ५० कोटी, तर ५० ठेकेदारांकडून प्रत्येकी दोन कोटी वसूल करण्यास सांगितल्याचे पत्रात लिहिले आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रात असा कुठलाच उल्लेख नाही.
परमबीर सिंग यांनी वाझेच्या गृहमंत्र्यांच्या बंगल्यातील भेटीवेळी त्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि अन्य एक, दोन स्टाफ असल्याचे म्हटले आहे तर वाझेच्या पत्रात पलांडेचा उल्लेख नाही. बारमधून वसुलीचा विषय काढण्यात आला, त्यावेळी देशमुख यांचे पीए कुंदन हजर असल्याचे लिहिले आहे.
सीबीआयची परमबीर सिंग यांच्याकडे चौकशी; पुन्हा बाेलावण्याची शक्यता
मुंबई : दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपाप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी केलेल्या आरोपांबाबत त्यांचा सविस्तर जबाब नोंदविण्यात आला असून त्यांना पुन्हा बाेलावण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त राजू भुजबळ आणि सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांचाही जबाब नोंदविला जाण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने मंगळवारपासून हप्ता वसुलीच्या आरोपाची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. याचिकाकर्ती जयश्री पाटील यांच्याकडून रीतसर तक्रार नोंदवून घेण्यात आली. त्यानंतर आज तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ‘लेटरबॉम्ब’द्वारे आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांना पाचारण करण्यात आले होते.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आरोपांच्या अनुषंगाने सविस्तर विचारणा केली. त्यामध्ये आरोपांना काय आधार आहे, या संपूर्ण प्रकरणाची त्यांना माहिती होती का? त्याबाबत समजल्यानंतर त्याचवेळी सचिन वाझेचा जबाब नोंदवून का? घेतला नाही, त्याबाबत तक्रार घेतली का? याबाबत त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली.
त्याचा जबाब नोंदविण्यात आला असून त्यांना आवश्यकत्यानुसार पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असे सांगण्यात आले. परमबीर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांच्या पत्रात उल्लेख असलेल्या उपायुक्त भुजबळ, एसीपी पाटील यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य साक्षीदार सचिन वाझे याच्याकडे चौकशी केली जाणार आहे.