“माझ्या वक्तव्याचा विपर्यास, एका समाजाचं कौतुक दुसऱ्या समाजाचा अपमान नसतो”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:32 PM2022-07-30T12:32:19+5:302022-07-30T12:33:16+5:30

मुंबईवरील वक्तव्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण

Contrary to my statement praise of one society is not insult to another bhagatsingh koshyari on mumbai statement financial hub | “माझ्या वक्तव्याचा विपर्यास, एका समाजाचं कौतुक दुसऱ्या समाजाचा अपमान नसतो”

“माझ्या वक्तव्याचा विपर्यास, एका समाजाचं कौतुक दुसऱ्या समाजाचा अपमान नसतो”

googlenewsNext

मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं.  त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान, आता राज्यपालांनी यावर स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे.

“मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला,” असं राज्यपाल म्हणाले. काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.



वक्तव्याचा विपर्यास
“पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो,” असं राज्यपालांनी नमूद केलं. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असंही त्यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

Web Title: Contrary to my statement praise of one society is not insult to another bhagatsingh koshyari on mumbai statement financial hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.