मुंबई : जनतेला मोकळा श्वास घेता यावा, पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन व्हावे, याकरिता मुंबईतील उद्याने आवश्यक आहेतच. त्यासोबतच चिमणी आणि पक्ष्यांच्या इतर प्रजातींचे शहरीकरणात रक्षण व संवर्धन होण्यासाठीदेखील उद्याने व त्यातील वृक्षराजी हातभार लावते आहे. मुंबईसारख्या महानगरांत जागेची कमतरता असतानाही या समस्येवर मात करून प्रशासन उद्याने टिकविण्यासाठी आणि फुलविण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.महापालिकेतर्फे नूतनीकरण करण्यात आलेल्या फोर्ट येथील लक्ष्मीदास रावजी तेरसी भाटिया बागेचे लोकार्पण स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. महापालिकेच्या माध्यमातून उद्यानांचा विकास कार्यक्रम राबविण्यात येत असून, या उद्यानांमधून चिमणी व इतर पक्ष्यांच्या प्रजातींना वाढत्या शहरीकरणात निवारा व आधार मिळेल आणि त्यांचे रक्षण होईल, असा आशावादही महापौरांनी या वेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)भाटिया बागेच्या नूतनीकरणाचे काम २६ फेब्रुवारी २०१४ रोजी सुरू करण्यात आले. मैदानातील जुनी संरक्षक भिंत आणि पदपथ काढून टाकण्यात आले. नूतनीकरणामध्ये नवीन संरक्षक भिंत बांधताना आकर्षक व नक्षीदार जाळ्या लावण्यात आल्या आहेत. मातीचा पदपथ, नवीन कारंजे, आसन व्यवस्था, सिंहाच्या प्रतिकृती, मुलांसाठी खेळणी, खुली व्यायामशाळा, नक्षीदार दिव्यांचे खांब, आकर्षक व नक्षीदार प्रवेशद्वार यांचा नूतनीकरण कामांमध्ये समावेश आहे. त्यासोबत सुरक्षा रक्षकांसाठी कक्ष, भूमिगत पाण्याची टाकी, माळी कक्षाची दुरुस्ती ही कामेदेखील करण्यात आली आहेत. सुमारे १ कोटी ७० लाख रुपये खर्च करून ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली असून, मेसर्स देव इंजिनीअर्स हे या कामाचे कंत्राटदार आहेत.
पक्ष्यांच्या रक्षणासाठी उद्यानांचा हातभार
By admin | Published: March 21, 2016 2:12 AM