Join us

जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विनंती अर्ज समितीचे योगदान महत्वाचे - नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 7:00 PM

मागील १० वर्षात अत्यंत महत्वाचे असे २० अहवाल या समितीने सादर केले असून शासनाकडून त्याची उचित दखल घेत कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती तथा विधानपरिषद विनंती अर्ज समितीच्या पदसिद्ध समिती प्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.  

मुंबई : सन्माननीय सदस्यांना प्राप्त झालेल्या निवेदनाच्या माध्यमातून समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना सोडविण्याचे, जनसामान्यांना न्याय प्राप्त करुन देण्याचे काम विधानपरिषदेच्या विनंती अर्ज समितीच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे केले जात आहे. मागील १० वर्षात अत्यंत महत्वाचे असे २० अहवाल या समितीने सादर केले असून शासनाकडून त्याची उचित दखल घेत कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती तथा विधानपरिषद विनंती अर्ज समितीच्या पदसिद्ध समिती प्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.  

मंगळवारी (दि.२) कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती आणि विनंती अर्ज समितीचे प्रमुख श्री. एस. के. प्राणेश यांच्या नेतृत्वाखाली समिती सदस्यांनी विधान भवन येथे अभ्यास भेट दिली आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी उभय राज्यातील समिती कामकाजाबाबतची माहिती घेतली आणि सविस्तर चर्चा केली.

प्राप्त झालेला विनंती अर्ज हा समितीकडे सोपविण्याबाबत सभापती यांचा अधिकार या संदर्भात महाराष्ट्र विधानपरिषद नियमात २३७-अ अन्वये सुधारणा करण्यात आली असून सभापतींना कोणताही विनंती अर्ज त्यांच्या स्वेच्छाधिकाराने नि:सत्र कालावधीत देखील विनंती अर्ज समितीकडे तपासणीसाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी आता सोपविता येणार आहे. अशी माहितीही यावेळी झालेल्या चर्चेच्या दरम्यान उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

बैठकीच्या प्रारंभी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती श्री. एस.के. प्राणेश यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या समितीचे निमंत्रित सदस्य महादेव जानकर, राजेश राठोड यांनी कर्नाटकच्या या अभ्यासगटाचे सदस्य सुनिल वाल्यापुरे, एस.एल.बोजे गौंडा, कुशलप्पा एम. पी, सुदाम दास, प्रदिप शेट्टर यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. 

टॅग्स :नीलम गो-हे