अहमदाबाद : गुजरातच्या दाहोद या आदिवासी जिल्ह्यातील एका दाम्पत्याने १७ मुले झाल्यानंतर अखेर संततिनियमन करून घेतले आहे! त्यांच्या १७ अपत्यांमध्ये १६ मुली आणि एक मुलगा आहे.संपूर्ण गावकऱ्यांनी आग्रह धरला नसता तर ४४ वर्षांचा रामसिंह सनगोत आणि त्याची ४० वर्षांची पत्नी कानू यांनी एव्हाना ‘हम दो, हमारे १८’ साध्यही केले असते. आणखी मुले व्हावी अशी माझी इच्छा होती. पण गावकऱ्यांनी आता ‘पूर्णविराम घे’ असा खूपच आग्रह धरल्याने अखेर मी कानूची नसबंदी करून घ्यायला तयार झालो, असे रामसिंह याने सांगितले. मुलगा होईल या आशेने आधी १३ मुली झाल्या. पण मुलगा झाल्यावरही आम्ही थांबलो नाही, अशी कबुलीही रामसिंह याने दिली. रामसिंह याच्या शेवटच्या १७व्या अपत्याचे (मुलीचे) अद्याप बारसेही झालेले नाही. विजय हा त्यांचा एकमेव मुलगा सन २०१३मध्ये १४वे अपत्य म्हणून जन्मला. त्यानंतरही आणखी तीन अपत्ये का जन्माला घातली याचा खुलासा करताना रामसिंग म्हणतो, ‘म्हातारपणी आधार म्हणून मुलगा हवा, असे वाटायचे. त्या हट्टापायी एवढ्या मुली जन्माला घातल्या की नंतर त्या मुलींची काळजी घेण्यासाठी एकटा भाऊ पुरेसा नाही, असे वाटू लागले. त्यासाठी आणखी मुलगा होण्यासाठी ‘चान्स’ घेत राहिलो.’ (वृत्तसंस्था)
आदिवासी दाम्पत्याचे १७ मुलांनंतर संततिनियमन
By admin | Published: January 02, 2017 6:07 AM