साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेच्या कायद्यांचा स्वीकार अन्य महापालिकांनी करावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 05:36 PM2019-07-15T17:36:15+5:302019-07-15T17:36:40+5:30

स्वाईन फ्लू, डेंग्यू, लेप्टोस्पारोसिस आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेने ज्या बाबी अंमलात आणल्या आहेत त्या राज्यातील महापालिकांनी स्वीकारुन त्यानुसार कार्यवाही करावी. असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

For the control of epidemic diseases Other municipal corporations are required to accept the laws of BMC | साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेच्या कायद्यांचा स्वीकार अन्य महापालिकांनी करावा

साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेच्या कायद्यांचा स्वीकार अन्य महापालिकांनी करावा

Next

 मुंबई -  राज्यात स्वाईन फ्लू, लेप्टोस्पारोसिस आणि डेंग्यू आजार नियंत्रणात आहे. साथरोग आणि कीटकजन्य आजारांचे दैनंदिन सर्वेक्षण केले जाते. राज्यात सुमारे 1 लाख 30 हजार व्यक्तींना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. स्वाईन फ्लू, लेप्टोस्पारोसिस आणि डेंग्यूच्या आजाराचे नियंत्रण करण्यासाठी महापालिकांनी अधिक सजग होऊन प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. महापालिकास्तरावर प्रतिबंधात्मक लसींची खरेदी करावी. सर्पदंश आणि विंचूदंशावरील औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. स्वाईन फ्लू, डेंग्यू, लेप्टोस्पारोसिस आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेने ज्या बाबी अंमलात आणल्या आहेत त्या राज्यातील महापालिकांनी स्वीकारुन त्यानुसार कार्यवाही करावी. असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मंत्रालयात साथरोग नियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील साथरोग परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या राज्यात साथरोगाचा उद्रेक नसून परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर भागात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने लेप्टो आजाराची शक्यता बळावते. या पार्श्वभूमीवर महापालिकांनी ज्या भागात पाणी साचून राहते तेथील अतिजोखीमीच्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक उपचार सुरु करावेत. कोकण किनारपट्टीवरील ग्रामीण आणि शहरी भागातील संशयित रुग्णांचे प्रयोगशाळा नमुने नियमित पाठविण्यात यावे. उंदीर नियंत्रणासाठी आंतरविभागीय समन्वय ठेवावा, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

नाशिक, नागपूर, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळून आली आहे. या भागातील महापालिकांनी अधिक दक्ष राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जाणीव जागृती मोहीम घेणे गरजेचे आहे. जलजन्य आजारांबाबत जे विशेष नियम मुंबई महापालिकेने तयार केले आहे त्यांचा अंगीकार करुन अन्य महापालिकांनी कार्यवाही करावी. त्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील महापालिकांना निर्देश‍ दिले जातील. विविध आजारांवरील प्रतिबंधात्मक लसी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत महापालिकांना पुरविल्या जातात. मात्र वाढती मागणी लक्षात घेता महापालिकांनी लसींची खरेदी करावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

स्वाईन फ्लू उपचारासाठी जो प्रोटोकॉल तयार करण्यात आला आहे त्यानुसार खासगी रुग्णालयांनीदेखील वापर करत उपचार करावा. त्याचबरोबर स्वाईन फ्लूच्या संशयित रुग्णांना तातडीने टॅमीफ्लूच्या गोळ्या देऊन उपचार सुरु करावेत. यासाठी खासगी डॉक्टरांची कार्यशाळा घ्यावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी दर आठवड्याला आपल्या भागातील साथरोगाचा आढावा घ्यावा, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात 15 जुलैअखेर 1772 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 191 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत लेप्टोचे केवळ 36 रुग्ण आढळून आले आहे. त्यातील 25 रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील, 9 रुग्ण सिंधुदूर्ग जिल्ह्यात, पुणे आणि भिवंडी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहे. लेप्टो प्रभावीत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जलद निदान कीटची व्यवस्था करण्यात आली आहे. तर जिल्हा रुग्णालय व निवड उप जिल्हा रुग्णालयात एलायझा चाचणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या आजारावरील प्रभावी औषध असलेले डॉक्सीसायक्लीन सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. राज्यात डेंग्यूचे 1232 रुग्ण आढळून आले आहे. जलजन्य आजारांमध्ये गॅस्ट्रोचे 399 रुग्ण, अतिसाराचे 471, कावीळीचे 542 रुग्ण आढळून आले आहे.

यावेळी मलेरिया, चिकुनगुनिया, जपानी मेंदूज्वर, माकडताप, चंडीपूरा या आजारांबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास, साथरोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.सुभाष साळुंके, आरोग्य आयुक्त डॉ.अनुपकुमार यादव, आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील, सहआयुक्त डॉ.सतीश पवार आदी उपस्थित होते.

Web Title: For the control of epidemic diseases Other municipal corporations are required to accept the laws of BMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.