लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यासह मुंबईत वैद्यकीय प्रयोगशाळांचा सुळसुळाट झाला आहे. शिवाय, बऱ्याचदा या प्रयोगशाळा रुग्णांच्या जीवाशी खेळतानाही दिसून येतात. परंतु, आता या वैद्यकीय प्रयोगशाळांवर नियंत्रण व नियमनासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक तत्त्वे तयार करून विशेष समितीची नियुक्ती केली आहे.
राज्यात सद्य:स्थितीत १५ हजार वैद्यकीय प्रयोगशाळा अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. परंतु या क्षेत्रात अद्यापपर्यंत कोणतेही मार्गदर्शक तत्त्वे नसल्यामुळे कायदेशीर अडचणी येत असल्याचे दिसून येत होते. परिणामी, याविषयी ठोस मार्गदर्शक तत्त्वांविषयी सातत्याने मागणी होत होती.
आता राज्य शासनाकडून नियुक्त करण्यात आलेली समिती वैद्यकीय प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी व व्यवसायाचे नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे, अवैध आणि बोगस वैद्यकीय प्रयोगशाळा निर्बंध आणण्यासाठी ठोस उपाययोजना सुचविणे आणि खासगी प्रयोगशाळांकडून विविध प्रकारांच्या तपासणीकरिता आकारण्यात येणारे शुक्ल यात एकसूत्रीपणा आणणे अशा समितीच्या कार्यकक्षा आहेत. या समितीने शासनाला सहा महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत. या समितीच्या अध्यक्षपदी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त अभियान संचालक असणार आहेत, तर समितीत एकूण दहा सदस्यांचा समावेश आहे.