Join us

कोरोनाशी लढण्यास नियंत्रण कक्ष चौवीस तास कार्यान्वित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 6:14 PM

आतापर्यंत २५ लाख ३२ हजार अन्न पाकिटांचे वितरण 

आतापर्यंत २५ लाख ३२ हजार अन्न पाकिटांचे वितरण 

खलील गिरकर

मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने घरात अडकलेल्या, रोजगार बुडालेल्या गरजू नागरिकांना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुमारे सव्वाशे पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांच्या द्वारे जेवण, शिधा पोचवण्याचे काम केले जात आहे. २५ मार्च पासून २१ एप्रिल पर्यंत २५ लाख ३२ हजार जेवणाची अन्न पाकिटे वितरीत करण्यात आली. तर १ लाख ४१ हजार रेशन पाकिटे वितरीत करण्यात आली.  दररोज सुमारे १ लाख ३० हजार अन्न पाकिटे दिली जातात.२१ एप्रिलला उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हद्दीत १ लाख ४१ हजार २४९ अन्न पाकिटे १२७ स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरीत करण्यात आली. तर, ३ हजार ७०९ रेशन पाकिटे वितरीत करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे समन्वयक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांच्यावर जबाबदारी आहे. या कक्षाकडे येणारी प्रत्येक तक्रार व माहितीची दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली जाते, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. सायंकाळी दिवसभरातील कामाचा आढावा  गायकवाड यांच्यामार्फत घेतला जातो. १५ उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी या कामाचे नोडल ऑफिसर म्हणून समन्वय करत आहेत.१२५ स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत अन्न पाकिटे पोचवली जात आहेत.  विविध राज्यातील सुमारे ६५ हजार मजूर या ठिकाणी वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली त्यांना अन्न पाकिटे व रेशन देण्यात येत आहे. प्रत्येक स्वयंसेवी संस्थांना विभाग वाटून देण्यात आला आहे. काही स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक इतर ठिकाणी गरजेप्रमाणे कामासाठी दिले जात आहेत. २५ निवारागृहे निश्चित करण्यात आली आहेत त्यापैकी ३ निवारागृहांमध्ये ४०० पेक्षा जास्त जण वास्तव्य करत आहेत. वांद्रे येथील उत्तर भारतीय भवन, वर्सोवा येथील सिव्हिल डिफेन्स ग्राऊंड, विक्रोळी कन्नमावार नगर येथील म्हाडा कॉलनी या ठिकाणी वास्तव्य करत आहेत.मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या क्षेत्रात महापालिकेने ५४० ठिकाणे अन्न पाकिटे देण्यासाठी निश्चित केली आहेत. त्यासाठी ३२ कम्युनिटी किचन द्वारे अन्न बनवले जाते. महापालिकेच्या कम्युनिटी किचनसाठी ९१ मेट्रिक टन तांदूळ (९१८ क्विंटल), १८.३ मेट्रिक टन (१८३ क्विंटल)  तूर डाळ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महापालिकेतर्फे हे धान्य स्वयंसेवी संस्थांना दिले जाते त्यानंतर त्याचे अन्न शिजवून अन्न पाकिटे तयार करुन महापालिकेला दिले जातात व महापालिकेतर्फे सीडीओ मार्फत त्याचे वाटप केले जाते. 

नियंत्रण कक्ष चौवीस तास कार्यरत, उपजिल्हाधिकारी तैनात : दररोज नियंत्रण कक्षाला एसएमएस, इ मेल, दूरध्वनीद्वारे माहिती मिळते. माहिती मिळाल्यानंतर त्याची छाननी केली जाते. उपजिल्हाधिकारी त्याची गरज तपासतात. संबंधित व्यक्तीकडे रेशनकार्ड असेल तर त्याला रेशन कार्डवर धान्य मिळेल त्याची व्यवस्था केली जाते. ज्याच्याकडे रेशनकार्ड नसेल तर त्यांना किती धान्याची गरज आहे ते विचारुन संबंधितांना रेशन पुरवले जाते व अन्न पाकिटे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पुरवले जातात. कम्युनिटी किचन चालवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना २१ रुपये किलो गहू व २२ रुपये किलो दराने एफसीआयतर्फे धान्य उपलब्ध करुन दिले जाते. बोरीवली येथील एफसीआयच्या गोडाऊन मधून हे धान्य वितरीत केले जातात.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस