Join us

सुदृढ आरोग्यासाठी उच्च रक्तदाबावर नियंत्रण महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या काळात अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींना या संसर्गाचा धोका असल्याचे दिसून येते. त्यामुळे हृदयविकार, उच्च ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या काळात अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींना या संसर्गाचा धोका असल्याचे दिसून येते. त्यामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब , मधुमेह अशा स्वरूपाचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी प्रतिबंधात्मक काळजी घेतली पाहिजे, अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ हायपरटेन्शनचे अध्यक्ष डॉ. एस एन नारासिंगन यांनी दिली आहे. यंदा जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त, ‘स्वतःचे रक्तदाब मोजा, त्यावर योग्यप्रकारे नियंत्रण ठेवा आणि दीर्घायुष्याचा आनंद घ्या ही संकल्पना आहे.’

दवाखाना आणि त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी अचूक रक्तदाब मोजला जाण्यासाठी डॉक्टर्स, रुग्ण व सर्वसामान्य व्यक्ती यांना देखील हे उपयोगी ठरू शकते. महामारीच्या काळात रुग्णांना सल्लासेवा देण्यासाठी डॉक्टर्स डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करत आहेत. घरच्या घरी बीपी मोजून त्यावर नीट लक्ष ठेवणे, हे प्रत्येक हायपरटेन्सिव्ह रुग्णासाठी अनिवार्य आहे. जेणेकरून डॉक्टर्सना त्यांचे बीपी नियंत्रणात राखणे शक्य होईल व त्यांच्या आरोग्याला संभवणाऱ्या धोक्यांची शक्यता कमी होईल, असेही आवर्जून डॉ. नारासिंगन यांनी नमूद केले.

जेव्हा ब्लड प्रेशर अति जास्त प्रमाणात वाढते, तेव्हा निर्माण होणाऱ्या स्थितीला हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर म्हणतात. अशावेळी रक्तामध्ये वाढलेले बल वाहिन्यांच्या भिंतींवर पडत असते. सर्वसामान्य ब्लड प्रेशर १२०/८० एमएम एचजी असते. विविध मार्गदर्शक सूचनांनुसार हाय ब्लड प्रेशरमध्ये ही पातळी १३०/८० एमएम एचजी किंवा १४०/९० एमएम एचजीपेक्षा जास्त असते. हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन हा सायलेंट किलर मानला जातो. हाय ब्लड प्रेशरमुळे मेंदू, हृदय, किडनी आणि रक्तवाहिन्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. हाय ब्लड प्रेशरचे निदान आणि त्यावरील योग्य उपचार लवकरात लवकर न झाल्यास यामुळे अर्धांगवायू, हृदय निकामी होणे किंवा हृदयविकाराचा झटका आणि किडनी निकामी होणे, असे धोके संभवतात.

तीन भारतीयांपैकी एकाला त्रास

देशात उच्च रक्तदाबग्रस्त व्यक्तींचे प्रमाण खूप जास्त आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील दर तीन भारतीयांपैकी एका व्यक्तीला हा त्रास आहे. देशात हायपरटेन्शन असलेल्या व्यक्तींची टक्केवारी २९.८ आहे. यावर उपचार करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे किती महत्त्वाचे आहे, हे यावरून समजते.

हे लक्षात ठेवा...

• मोकळ्या दंडावर योग्य आकाराचे बीपी कफ चढवले गेले पाहिजे, दंडावर कपडा असेल आणि त्यावर बीपी कफ चढवले गेल्यास बीपी जास्त मोजला जाऊ शकतो.

• रक्तदाब मोजताना मूत्राशय (ब्लॅडर) रिकामी असणे महत्त्वाचे आहे.

• रक्तदाब मोजला जात असताना रुग्ण व रक्तदाब मोजणारी व्यक्ती या दोघांनीही बोलणे टाळावे.

• रक्तदाब मोजण्याच्या ३० मिनिटे आधी काहीही खाणे, कॅफिन, धूम्रपान, अल्कोहोल यांचे सेवन करणे टाळावे.

• घरी रक्तदाब मोजताना कमीत कमी तीन रीडिंग्ज तरी घ्याव्यात आणि शेवटच्या दोन रीडिंग्जची सरासरी ही रक्तदाब म्हणून मानली जावी.