वादग्रस्त सीएच्या हाती ‘न्यू इंडिया’चा तपास; आर्थिक गुन्हे शाखेकडून ऑडिटरला समन्स; माजी सीईओची चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 05:33 IST2025-02-20T05:32:54+5:302025-02-20T05:33:44+5:30
धक्कादायक बाब म्हणजे, न्यू इंडिया बँकेच्या गैरव्यवहाराच्या चाैकशीसाठी आरबीआयतर्फे नेमण्यात आलेल्या बाेर्डात देशमुखचाही समावेश आहे. त्यामुळे देशमुखच्या चौकशीतून काय समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वादग्रस्त सीएच्या हाती ‘न्यू इंडिया’चा तपास; आर्थिक गुन्हे शाखेकडून ऑडिटरला समन्स; माजी सीईओची चौकशी सुरू
मुंबई : न्यू इंडिया को-ऑप. बँकेला २०१९ ते २०२१ या दोन आर्थिक वर्षाचे ऑडिट देणाऱ्या संजय राणे ॲण्ड असोसिएट्सचा सीए अभिजीत देशमुखला आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावत गुरुवारी चौकशीसाठी बोलावले आहे. देशमुखने बँकेच्या ऑडिटला ए ग्रेडचे प्रमाणपत्र दिले होते. धक्कादायक बाब म्हणजे, न्यू इंडिया बँकेच्या गैरव्यवहाराच्या चाैकशीसाठी आरबीआयतर्फे नेमण्यात आलेल्या बाेर्डात देशमुखचाही समावेश आहे. त्यामुळे देशमुखच्या चौकशीतून काय समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या मागणीनुसार बँकेकडून ऑडिट रिपोर्ट सादर करण्यात आले. याच ऑडिट रिपोर्टच्या आधारे तपास सुरू केला आहे. त्यामध्ये २०१९-२० आणि २०२०-२१चे ऑडिट रिपोर्ट देशमुखने दिल्याचे समोर आले.
देशमुखने ऑडिट ‘ए ग्रेड’चे प्रमाणपत्रही दिले आहे. त्याने हे प्रमाणपत्र देताना कॅश व्हेरिफिकेशन केली होती का? त्याने कुठल्या आधारे ऑडिट केले? त्याचाही यामध्ये कसा सहभाग आहे? याच्या चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्याच्या चौकशीतून महत्त्वपूर्ण माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.
न्यू इंडिया को-ऑप. बँकेच्या अंतर्गत गैरव्यवहारामुळे आरबीआयने बँकेवर प्रशासक नेमत चौकशी सुरू केली आहे. याच चौकशीत त्यांच्या बोर्डावर देशमुखलाही घेण्यात आले आहे. एकीकडे २०२१पासून या बँकेवर आरबीआयचे सुपरव्हिजन असताना हा घोटाळा कसा झाला? हा प्रश्न उपस्थित होत असताना देशमुखच्या नियुक्तीमुळे आरबीआयच्या काही अधिकाऱ्यांवरील संशय आणखी बळावला आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखा सर्व बाजूने तपास करत आहे.
अभिमन्यू भोअनकडे चौकशी सुरू
माजी सीईओ अभिमन्यू भोअनकडे चौकशी सुरू केली आहे. तो २०१९पासून पाच वर्षे सीईओ पदावर कार्यरत होता. त्याच्या चौकशीतून काय पुढे येते, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
त्या दिवशी नेमके काय घडले?
१२ तारखेला आरबीआयच्या चौकशीदरम्यान नेमके काय घडले? चौकशीत काय समोर आले? या अहवालासह आरबीआयने ऑन कॅमेरा घेतलेला कबुली जबाबाचा व्हिडीओही आरबीआयकडे मागण्यात आला आहे. तसेच आरबीआयच्या संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
...असे आले आरोपी संपर्कात
महाव्यवस्थापक हितेश मेहताने अटक आरोपी विकासक धर्मेश पौनला २०१६मध्ये जुने घर विकले होते. त्यामुळे तो त्याच्या संपर्कात होता. तसेच धर्मेशच्या चारकोप येथील एसआरए प्रोजेक्टसाठी लोन मिळवून देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी न झाल्याने त्याला कोट्यवधी रुपये दिल्याचे सांगितले. दुसरीकडे, पसार सोलर व्यावसायिक अरूणभाईसोबत व्यावसायिक संबंधित भेट झाल्याचे सांगितले. त्याचा पोलिस तपास करत आहेत.