Join us

अखेर वादग्रस्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:05 AM

२८ जूनपर्यंत एनआयए कोठडी; ॲण्टेलिया स्फोटक कार, मनसुख हिरेन हत्या प्रकरणमुंबई : ॲण्टेलिया स्फोटक कार व ठाण्यातील व्यावसायिक ...

२८ जूनपर्यंत एनआयए कोठडी; ॲण्टेलिया स्फोटक कार, मनसुख हिरेन हत्या प्रकरण

मुंबई : ॲण्टेलिया स्फोटक कार व ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी वादग्रस्त माजी पोलीस एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक केली. लोणावळा येथील एका रिसॉर्टवरून त्याला ताब्यात घेण्यात आले तर अंधेरीतील त्याच्या फ्लॅट व फाऊंडेशनच्या कार्यालयावर छापे टाकून महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले.

शर्माने गुन्ह्याचा कट व पुरावे नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्याला २८ जूनपर्यंत एनआयए कोठडी मिळाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. शर्माने विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन नालासाेपारा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारींमध्ये प्रदीप शर्माचाही उल्लेख आहे. त्यामुळे त्याच्यावरील कारवाई परमबीर सिंग यांच्यासाठीही अडचणीची ठरण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली.

कारमायकल रोडवरील उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या ॲण्टेलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार व मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी एनआयएने आतापर्यंत आठजणांना अटक केली आहे. त्यामध्ये ५ आजी-माजी पोलिसांचा समावेश आहे.

एनआयएने गेल्या रविवारी पश्चिम उपनगरातील बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना अटक केली. हे दोघेही प्रदीप शर्माशी संबंधित असून, त्याच्या फाऊंडेशनमध्ये पदाधिकारी होते. हिरेनच्या हत्येवेळी ते उपस्थित असल्याचे तपासातून पुढे आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडील चौकशीतून शर्माचाही सहभाग स्पष्ट झाल्याने तपास पथक त्याच्या मागावर होते. गुरुवारी सकाळी त्याला लोणावळ्यातील एका रिसॉर्टवरून ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी अन्य दोन पथकांनी त्याचे अंधेरीतील फ्लॅट व कार्यालयावर छापा टाकला. जवळपास पाच तासांच्या झडतीत महत्त्वपूर्ण कागदपत्रे, रोकड, लॅपटॉप व अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आल्याचे समजते.

शर्माकडे सुमारे ६ तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायलयाने २८ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली.

एनआयएने या प्रकरणात आतापर्यंत शर्मा याच्याशिवाय मुख्य आरोपी असलेला सचिन वाझे, रियाज काझी व सुनील माने या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना तर लखन भय्या एन्कांऊटरमध्ये बडतर्फ असलेल्या विनायक शिंदेला अटक केली आहे. शिंदे हा क्राईम ब्रँचला आल्यापासून शर्माचा विश्वासू ‘कलेक्टर’ म्हणून ओळखला जात होता. शर्माच्या ‘व्हीआरएस’नंतर वाझे पुन्हा खात्यात हजर झाल्यानंतर शर्मासाठी ‘कलेक्शन’ची कामे करत होता. लोहार व जाधव हे तर शर्माच्या सांगण्यानुसार काम करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

* शर्माच्या घरातून रिव्हॉल्व्हर जप्त

एनआयएने प्रदीप शर्माच्या अंधेरीतील भगवान भवनमधील घर व पीएस फाऊंडेशनमध्ये टाकलेल्या छाप्यात रिव्हॉल्व्हर सापडले असून, त्याच्या परवान्याची मुदत संपलेली आहे. याशिवाय त्यांनी मोठ्या प्रमाणात रोकड, लॅपटॉप, दस्तऐवज व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्याचे समजते.

.........................................................