Join us

वादग्रस्त निरीक्षक कोथमिरे, दया नायक यांची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:06 AM

* गडचिरोली, गोंदियाला तडकाफडकी उचलबांगडीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ठाण्यातील खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार कोथमिरे व ...

* गडचिरोली, गोंदियाला तडकाफडकी उचलबांगडी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ठाण्यातील खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार कोथमिरे व दहशतवादविरोधी पथकातील निरीक्षक दया नायक यांची गुरुवारी तडकाफडकी बदली करण्यात आली.

कोथमिरे यांची गडचिरोलीला, तर नायक यांची गोंदियाला उचलबांगडी करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयातून गुरुवारी त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असून, त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याची सूचना घटकप्रमुखांना करण्यात आली आहे.

संजय पांडे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळल्यापासून वादग्रस्त आणि एकाच ठिकाणी ठिय्या मांडून असलेल्या अधिकाऱ्यांवर त्यांनी कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. सोमवारी (दि. ३) पाच पोलीस निरीक्षकांची विदर्भ व मराठवाड्यात बदली करण्यात आली होती. कोथमिरे यांच्याबद्दल अनेक तक्रारी गृहमंत्री, पोलीस महासंचालक कार्यालयात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांची गडचिरोलीला वाचक शाखेत बदली करण्यात आली आहे; तर राज्य सरकारच्या रडारवर असलेल्या अप्पर महासंचालक देवेन भारती यांच्या खास मर्जीतील समजल्या जाणाऱ्या दया नायक यांची गोंदिया जिल्ह्यात जात पडताळणी प्रमाणपत्र समितीमध्ये तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. महासंचालकांच्या वतीने अप्पर महासंचालक (आस्थापना) के. के. सरंगल यांनी याबाबतचे आदेश बजाविले.