* सीआयडीकडून शोध सुरू
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही महिन्यापासून बेपत्ता असलेले वादग्रस्त आयपीएस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह बेपत्ता झाले आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाकडून (सीआयडी) त्यांचा शोध सुरू असून, एक पथक त्यांच्या मूळगाव चंदीगड येथे ठिय्या मारून आहेत. ते त्यांच्या निवासस्थानी सापडले नसल्याने अन्यत्र शोध घेण्यात येत आहे. परमबीर सिंह यांना न्या. चांदीवाल आयोगाने बजावले असून अजामीनपात्र वाॅरंट देण्यासाठी पथक तिकडे गेले आहे. मात्र ते नमूद पत्त्यावर आढळून आले नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
परमबीर यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांच्याही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊन खंडणीचे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे ३० एप्रिलपासून ते रजेवर चंदीगडला गेल्यानंतर अद्याप परतलेले नाहीत. सुरुवातीला आठ दिवसाची रजा घेतल्यानंतर त्यांनी सातत्याने आजारी असल्याचे प्रमाणपत्र पाठवून ‘मेडिकल लिव्ह’ वाढवीत राहिले. पण गेल्या १५ दिवसापासून त्यांनी त्याबाबत गृहविभागाशी पत्रव्यवहार केला नसल्याचे समजते.
दरम्यानच्या काळात त्यांनी लिहिलेल्या पत्राबाबत राज्य सरकारने नेमलेल्या न्या. चांदीवाल आयोगाच्या सुनावणीला ते एकदाही हजर राहिलेले नाही. त्यामुळे आयोगाने सप्टेंबरच्या सुनावणीवेळी अजामीनपात्र वाॅरंट बजावले. सीआयडीने तो लागू करण्यासाठी सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या मदतीने मरिन लाईन्स येथील सरकारी निवासस्थानी संपर्क साधला. मात्र ते घर गेल्या पाच महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे पथकाने चंदीगड येथील निवासस्थानी जाऊन शोधाशोध सुरू केली आहे. मात्र तिकडेही ते सापडलेले नसून त्यांच्याशी संबंधिताच्या ठिकाणी शोध घेतला जात आहे. ठाणे पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी खंडणीच्या गुन्ह्यासंदर्भात परमबीर सिंह यांच्याविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली आहे.
-----------
बुधवारच्या सुनावणीकडे लक्ष
चांदीवाल आयोगाची चौकशी रद्द करण्याची परमबीर सिंह यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे या चौकशीची सुनावणी येत्या २२ सप्टेंबरला होणार आहे. सीआयडीचे पथक यावेळी वाॅरंटबाबत अहवाल सादर केल्यानंतर आयोग परमबीर सिंह यांच्याविरुद्ध पुढील कारवाईबाबत निर्णय घेईल, त्यांना आणखी एकवेळा हजर होण्याची संधी देऊन त्यानंतरही हजर न झाल्यास फरार घोषित केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले.
---------------------------------------
नेपाळमार्गे लंडनला पलायन?
परमबीर यांचे दोन्ही मोबाईल पाच महिन्यापासून स्वीच ऑफ आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ‘लूक आऊट’ नोटीस जाहीर केली असली तरी त्यापूर्वीच परदेशात गेल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. ते नेपाळमार्गे लंडनला गेले असल्याचे सांगितले जाते, मात्र त्याबाबत अधिकृत काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.