रक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा
By मुकेश चव्हाण | Published: January 28, 2021 08:06 AM2021-01-28T08:06:24+5:302021-01-28T08:16:11+5:30
याप्रकरणी आता थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे.
मुंबई: भाजपाच्या अधिकृत वेबासाईटवर एक मोठी चूक झाली आहे. रावेर मतदारसंघातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचा या वेबसाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी आता थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. मात्र हा सर्व गोंधळ गुगल भाषांतरामुळे निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे.
भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपाने संबंधित दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर पुढील कारवाई करेल', असा इशारा अनिल देशमुख यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिला आहे.
भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. @BJP4India आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा @MahaCyber1 पुढील कारवाई करेल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 27, 2021
गुगल भाषांतरामुळे गोंधळ!
प्रत्यक्षात याबाबत खातरजमा केली असता हा भाषांतराचा गोंधळ असल्याचे दिसत आहे. भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व खासदारांची यादी आहे. वेबसाइटवर इंग्रजी आणि हिंदी असे पर्याय आहेत. हिंदीचा पर्याय निवडल्यानंतर खासदारांच्या यादीत रक्षा खडसे यांचा उल्लेख योग्यच असल्याचे दिसत आहे. श्रीमती रक्षा खडसे, रावेर (महाराष्ट्र) असे कॅप्शन रक्षा यांच्या फोटोला देण्यात आले आहे. तर Raver या इंग्रजी शब्दाचे गुगल ट्रान्स्लेटमध्ये जाऊन हिंदीत भाषांतर केले असता होमोसेक्सुअल असा अर्थ सांगितला जात आहे. त्यामुळे या भाषांतरातूनच हा सारा गोंधळ झाल्याचे दिसत आहे.