मुंबई : मुंबई : ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यापूर्वी स्थानिक पोलीस उपायुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे वादग्रस्त आदेश मागे घेत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आता तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असे आदेश जारी केले आहेत. अनेकदा खासगी वैमनस्यातून ‘पाेक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र पुढे योग्यरीत्या तपास झाला नाही आणि संबंधित आरोपी दोषी नसेल तर त्याला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते, असे नमूद करीत आयुक्त संजय पांडे यांनी ते आदेश अलीकडेच दिले होते. मात्र त्यामुळे बालहक्कांबाबत काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाल हक्क संरक्षण आयोगाने दोन दिवसात ते आदेश मागे घेण्यात यावेत, असे पत्र संजय पांडे यांना पाठवले हाेते. त्यानंतर आता पाेक्सोसंदर्भात तक्रारी दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सहायक आयुक्त तसेच उपायुक्तांशी दूरध्वनीवर संपर्क साधून शहानिशा करीत त्वरित गुन्हा दाखल करावा. तसेच अटक आरोपीला अटक करण्यापूर्वी सहायक आयुक्तांचे योग्य आदेश घ्यावेत आणि उपायुक्तांनी स्वत: गुन्ह्याच्या तपासावर देखरेख करावी, असे कार्यालयीन आदेश आयुक्त पांडे यांनी जारी केले आहेत.
बालहक्क संरक्षण आयोगाची नाराजीमुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ६ जूनला परिपत्रक जारी करून विनयभंग व पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी सहायक पोलीस आयुक्तांची शिफारस आणि पोलीस उपायुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक केले. या परिपत्रकामुळे लैंगिक अत्याचार पीडितांच्या हक्कांचे उल्लंघन होईल, अशी भीती व्यक्त करत राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने हा आदेश तत्काळ मागे घेण्यास सांगितले होते.