मुंबई :मुंबई विद्यापीठाची वादात सापडलेली सिनेट निवडणूक मंगळवारी होणार असताना शिंदेसेनेच्या विद्यार्थी संघटनेने 'अभाविप'चा पाठिंबा काढून घेतल्याने खळबळ उडाली आहे. 'अभाविप'ने यापूर्वी विद्यापीठाने स्थगितीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली घेतल्याचा आरोप केला होता. आता त्या विधानावर आक्रमक होत शिंदेगटाच्या युवासेनेने 'अभाविप जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही,' अशी भूमिका जाहीर केली आहे.
या पार्श्वभूमीवर दोघांच्या भांडणात ठाकरे गटाच्या युवासेनेचे पारडे जड होणार. अशा चर्चा सरू झाल्या असन निवडणुकीत अतिशय चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे.
यापूर्वी राज्य सरकारने सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान घेण्याचे जाहीर केले. मात्र अचानक या निवडणुकीला तात्पुरती स्थगिती मिळाल्यामुळे अनेक उमेदवार संतप्त झाले. त्यावरून मुख्यमंत्री आणि विद्यापीठाच्या भूमिकांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मात्र स्थगितीबाबतच्या विद्यापीठाच्या पत्रकात कुठेही मुख्यमंत्र्यांचा उल्लेख नसताना अभाविपने केलेला आरोप बिनबुडाचा आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सरकारमध्ये कार्यरत असताना अभाविपने जाणीवपूर्वक असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असे युवासेनेचे अॅड. सचिन पवार यांनी म्हटले आहे.
विद्यापीठावर कोणाचा दावा?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आतापर्यंत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे वर्चस्व राहिले आहे. २०१० च्या निवडणुकीत युवासेनेने १० पैकी ८ जागा, तर २०१८ मध्ये सर्वच्या सर्व १० जागा जिंकल्या होत्या. मात्र आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य विद्यापीठ ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवासेनेला सत्तेसाठी झगडावे लागणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित संघटनांसह अन्य विद्यार्थी संघटनादेखील रिंगणात उतरल्याने निवडणूक रंगतदार ठरणार आहे.
१३,४०६ मतदार ठरवणार भवितव्य
सिनेटच्या १० जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य १३ हजार ४०६ मतदारांच्या हाती आहे. ३८ मतदान केंद्र आणि ६४ बूथवर २४ सप्टेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. मुंबई विद्यापीठ प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे.