शाळेतील सरस्वती, शारदा मातेच्या फोटोबाबत वादग्रस्त विधान, भुजबळांवर भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 08:47 AM2022-09-27T08:47:02+5:302022-09-27T08:50:56+5:30

शाळांमध्ये सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. त्यांना आम्ही काही पाहिले नाही.

Controversial statement about Saraswati, Sharda photo in school, BJP's counterattack on Chhagan Bhujbal | शाळेतील सरस्वती, शारदा मातेच्या फोटोबाबत वादग्रस्त विधान, भुजबळांवर भाजपचा पलटवार

शाळेतील सरस्वती, शारदा मातेच्या फोटोबाबत वादग्रस्त विधान, भुजबळांवर भाजपचा पलटवार

googlenewsNext

मुंबई - शाळेत देवी सरस्वतीऐवजी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांचा फोटो लावावा. याच फोटोंची शाळेत पूजा करा, असे विधान माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले. सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भुजबळ यांच्या या विधानावरुन आता वाद होण्याची शक्यता आहे. त्यातच, भाजप नेते राम कदम यांनी भुजबळांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. 

शाळांमध्ये सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. त्यांना आम्ही काही पाहिले नाही. त्यांनी आम्हाला काही शिकवले नाही. त्यांनी 'तीन टक्के' लोकांना शिकवले. आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची,' असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. अधिक बोललो असेल तर माफ करा, असे सांगत या महापुरुषांची आणि त्यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. छगन भुजबळ यांच्या विधाननंतर भाजप नेते राम कदम यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आमच्या देवदेवतांबद्दल एवढी चीड का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.  

'राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांना आमचे देव आणि देवतांबाबत एवढी चीड का ? हा खरा सवाल आहे. आज आमच्या देवी-देवतांचे फोटो खटकतात. उद्या आमची मंदिरेही खटकतील. उद्या मंदिरे कशाला पाहिजेत, तीही पाडून टाका म्हणतील', अशा शब्दात राम कदम यांनी टीका केली. 

कदमांनी शिवसेनेलाही केलं लक्ष्य

'आता राष्ट्रवादीचे जोडीदार श्रीमान पेंग्विन सेनेची काय भूमिका हे त्यांनी स्पष्ट करावे. सर्व महापुरुष आमच्यासाठी आराध्य आहेत मात्र देवी देवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही', असेही राम कदम पुढे म्हणाले.

देशाच्या तरुणाईच्या मनात फुलेंचा विचार रुजावा

दरम्यान, महात्मा फुलेंचे विचार देशातील तरुणाईच्या मनात रुजविण्याची आवशक्यता असल्याचे शरद पवार यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करुन, विज्ञाननिष्ठ, आधुनिक विचारांची सखोल अभ्यासपूर्ण मांडणी केली. फुलेंचा विचार परिवर्तनवादी, विज्ञानाचा पुरस्कर्ता, समाजातील शेवटच्या माणसांचे हित जपणारा आहे. हा विचार वाढविण्याची गरज आहे. फुले विचार आजच्या काळातही समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत उपयुक्त असून, हा विचार देशातील तरुणाच्या मनात रुजविण्याची आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. 
 

Web Title: Controversial statement about Saraswati, Sharda photo in school, BJP's counterattack on Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.