स्त्री प्रश्नांवरील सत्रावरून आयआयटीमध्ये वादंग; विद्यार्थी आणि प्रशासनात आरोप-प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 07:39 IST2025-01-09T07:37:37+5:302025-01-09T07:39:05+5:30
विद्यार्थी म्हणतात, चिंताजनक प्रकार, चर्चासत्र रद्द केले नाही, पुढे ढकलले!

स्त्री प्रश्नांवरील सत्रावरून आयआयटीमध्ये वादंग; विद्यार्थी आणि प्रशासनात आरोप-प्रत्यारोप
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आयआयटी, मुंबईतील जेंडर सेलने आयोजित केलेल्या चर्चासत्रावरून पुन्हा एकदा वादंग माजला आहे. ‘बनवारी देवी यांच्यामुळे आपले जग कसे बदलले’ या विषयावरील कामाच्या ठिकाणच्या लिंग विषमतेबाबतच्या प्रश्नावर हे चर्चासत्र होते. आयआयटी प्रशासनाने कोणतेही कारण न देता हे चर्चासत्र रद्द केल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. मात्र, हे चर्चासत्र रद्द केलेले नाही, पुढे ढकलण्यात आल्याचा दावा आयआयटी प्रशासनाने केला आहे. त्यामुळे यावरून पुन्हा आयआयटीतील शैक्षणिक स्वातंत्र्यांच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आयआयटी, मुंबईतील जेंडर सेलने ४ जानेवारीला हे चर्चासत्र ठेवले होते. त्यामध्ये वक्त्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या बनवारी देवी, कविता श्रीवास्तव यांच्यासह वकील वृंदा ग्रोव्हर या मार्गदर्शन करणार होत्या. मात्र, कार्यक्रमापूर्वी हे चर्चासत्र रद्द केल्याचे ई-मेल विद्यार्थ्यांना करण्यात आले. त्यामध्ये चर्चासत्र रद्द करण्याबाबत कोणतेही कारण नमूद केले नव्हते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
बनवारी देवी यांच्या संघर्षामुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या हिंसाचाराबाबत विशाखा गाईडलाईन्स तयार झाल्या. या चर्चासत्रात या विशाखा गाईडलाईन्सबाबत चर्चा केली जाणार होती. मात्र, प्रशासनाने हा कार्यक्रम रद्द केला. आयआयटी, मुंबईच्या संवादाच्या जागा नष्ट करण्याचा हा प्रकार आहे, तसेच संस्थेतील लोकशाही आणि शैक्षणिक स्वातंत्र्य संपविण्याचा प्रकार आहे, असा आरोप आयआयटी, मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंबेडकर- पेरीयार-फुले स्टडी सर्कल या संघटनेने केला आहे.
विद्यार्थी म्हणतात, चिंताजनक प्रकार
संस्थेतील जेंडर सेलच जर असे कार्यक्रम घेऊ शकत नसेल, तर महिलांवरील भेदभावाच्या अथवा लैंगिक अत्याचाराच्या घटना हा सेल कशा हाताळू शकेल, असा प्रश्नही एका विद्यार्थ्याने उपस्थित केला आहे.
तसेच, संस्थेने यापूर्वीही अनेक व्याख्याने आणि चर्चासत्रे रद्द केली आहेत. संस्थेतील नियोजित कार्यक्रम कोणतेही कारण न देता रद्द करण्याचा हा प्रकार चिंताजनक असल्याचेही विद्यार्थ्यांनी नमूद केले.
चर्चासत्र रद्द केले नाही, पुढे ढकलले
- आयआयटी मुंबई प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता, हे चर्चासत्र रद्द केले नसून केवळ पुढे ढकलण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.
- मात्र, हे चर्चासत्र पुढे का ढकलण्यात आले, याबाबत आयआयटी प्रशासनाने कोणतेही उत्तर दिले नाही.