रामदास कदमांसोबतच्या वादावर गजानन किर्तीकरांकडून पडदा; CM शिंदे आज बैठक घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 04:18 PM2023-11-14T16:18:49+5:302023-11-14T16:19:30+5:30
आम्ही ज्येष्ठ आहोत, आम्ही असे वादविवाद भांडायला लागलो तर खालच्या शिवसैनिकांपर्यंत चांगला संदेश जाणार नाही याची जाणीव आम्हाला आहे असं किर्तीकरांनी म्हटलं.
मुंबई – शिवसेनेच्या २ ज्येष्ठ नेत्यातील वाद विकोपाला गेला असून आज संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेरामदास कदमांसोबत चर्चा करणार आहेत. कदम आणि खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात मंगळवारी किर्तीकरांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री शिंदेशी चर्चा केली. त्यानंतर आता रामदास कदमांनी केलेल्या आरोपांवर गजानन किर्तीकरांनी भाष्य करणे टाळले आहे. माझ्याकडून मी या वादावर पडदा टाकल्याचे किर्तीकरांनी स्पष्ट केले आहे.
खासदार गजानन किर्तीकर म्हणाले की, रामदास कदम करत असलेले आरोप मला मान्य नाहीत. ते आरोप करतायेत म्हणून मी प्रतिआरोप करायचा या भूमिकेत मी आता नाही. माझ्यादृष्टीने माझ्याकडून या सर्व गोष्टीवर पडदा टाकला आहे. मी सविस्तर निवेदन, माझ्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केल्यात. मला त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आम्ही ज्येष्ठ आहोत, आम्ही असे वादविवाद भांडायला लागलो तर खालच्या शिवसैनिकांपर्यंत चांगला संदेश जाणार नाही याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे रामदास कदमांनी वारंवार कितीही टीका टिप्पणी, आरोप केले तरी त्यावर भाष्य करणार नाही असा शब्द मी मुख्यमंत्री शिंदेंना दिलाय आणि तो मी पाळणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच जर मुख्यमंत्र्यांना वाटलं तर आम्ही चर्चेला जाऊ. संवाद हवेत. मी नाही येणार असं हटून बसणार नाही. चर्चेला माझी तयारी आहे. जे काही असेल ते मुख्यमंत्र्यांसमोर आम्हाला दोघांना बसवलं तरी माझी तयारी आहे. माझ्यासाठी हा वाद संपला आहे. कुठल्याही मार्गाने काढायचा प्रयत्न केला तरी मी यावर अजिबात बोलणार नाही. माझ्याकडून वादावर पडदा पडला आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदे रामदास कदमांशी बोलणार आहेत. काल माझ्याशी बोलणे झाले आहे असंही खासदार गजानन किर्तीकरांनी सांगितले.
माझ्या नादी लागू नका, रामदास कदमांचा इशारा
प्रेसनोट काढण्याआधी तुम्ही मुख्यमंत्री शिंदेंना जाऊन भेटला असता तर हा तमाशा लोकांना दिसला नसता. हे फटाके फुटले नसते. आपण झक मारायची शेण खायचे आणि नंतर नेत्यांना भेटायचे असं त्यांचे राजकारण आहे. गजाभाऊ तुम्ही खरे काय आहात, तुमचे वस्त्रहरण करेन, माझ्या नादाला लागू नका. महिलासुद्धा तुम्हाला मते देणार नाहीत. आम्ही कडवट शिवसैनिक आहे. गद्दारी, बेईमानी आमच्या रक्तात नाही. पुण्याला काय गडबड आहे ती गजाभाऊंना कळाले असेल. गजाभाऊ राजकारण करतायेत. महिलांसमोर मते मागायला जाऊ शकतात का?, या वयात काय चाळे चाललेत हे सांगावे लागेल. मला उत्तर दिले पाहिजे असा इशाराही रामदास कदमांनी गजानन किर्तीकरांना दिला होता.