मुंबई/बीड - राज्याच्या राजकारणात गेल्या ७ ते ८ दिवसांपासून अजित पवार चांगलेच चर्चेत आले आहेत. अजित पवार नॉट रिचेबल झाल्याच्या दिवसापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळेच, सोशल मीडियावरही अजित पवार ट्रेंड करत आहेत. मात्र, मी राष्ट्रवादीतच राहणार आहे, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर मत व्यक्त केले आहे. अंधारे यांनी भाजपला लक्ष्य करत, भाजपनेच वावड्या उठवल्याचं म्हटलं. तसेच, अब तेरा क्या होगा कालिया... असे म्हणत शिंदे गटाच्या आमदारांवर टीकाही केली होती. आता या टिकेला शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे. ते जाणिवपूर्वक भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू आहे. वज्रमूठ सभा तसेच इतर सभा पाहता मुद्दामहून खोड करण्याची कार्यपद्धती भाजपची सुरू आहे. मात्र, आता सुरू असलेल्या राजकारणावरून शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटत असल्याचं अंधारे यांनी म्हटलं. तसेच, अजित पवारांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेवरुन शिंदे गटाचे बेगडी हिंदुत्व उघडे पडत आहे. राष्ट्रवादीसोबतची अनैसर्गिक युती आता नैसर्गिक कशी झाली? असा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटातील आमदार आणि नेत्यांना, अब तेरा क्या होगा कालिया... म्हणत सुषमा अंधारे यांनी टोला लगावला. त्यावर, आता शितल म्हात्रे यांनी पलटवार केला आहे.
खरं तर स्वतःच्या पक्षाची काळजी करण्याचे हे दिवस आहेत. कारण, दर दिवशी एकेक जण पक्ष सोडून जातोय, त्याकडे लक्ष द्यावं नाहीतर उरले सुरलेही जातील. अजित पवार यांनी तसंही सांगितलय की, आमची बाजू मांडायला आमचे प्रवक्ते आहेत. तेव्हा स्वतःच्या पक्षातच नाक खुपसावं. आमचं आम्ही बघू !, असे म्हणत शितल म्हात्रे यांनी सुषमा अंधारेंवर पलटवार केला आहे. शिवसेनेच्या दोन्ही महिला नेत्या सोशल मीडियावर भिडल्याचे दिसून येते.
मी राष्ट्रवादीतच आहे, राहणार
दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून माझ्याबद्दल आणि आमच्या सहकारी आमदारांबद्दल चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. त्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही. 40 आमदारांच्या सह्या घेतल्या आणि भाजपसोबत जाणार, असं दाखवलंय. पण, मी काही सह्या घेतल्या नाही, त्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. यामुळे आमचे कार्यकर्ते संभ्रमात जातात. कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी आपापली कामे करावीते. मीही तुमच्यासारखाच माणूस आहे, त्यामुळे सहनशिलतेचा अंत पाहू नका, अशी मी सर्वांना विनंती करतो.'
काँग्रेसमध्येही चलबिचल सुरू - शिरसाट
राष्ट्रवादी सोडून अजित पवार भाजपमध्ये जाणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. आमच्याकडे आले तरी स्वागत आहे. अजितदादा नॉट रिचेबल होणे नवीन नाही. सगळा फोकस अजित पवारांवर गेला आहे. सर्वोच्च न्यायालयातील केस आणि अजित पवारांची नाराजी, यामध्ये काहीही संबंध नाही, असे सांगताना केवळ अजित पवार नाही, तर काँग्रेसमध्येही चलबिचल सुरू आहे. त्यांच्या आकड्यांचीही बेरीज जुळूत नाही. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना आता आघाडीत राहू नये, असे वाटत असल्याचा दावाही संजय शिरसाट यांनी केला.