‘पद्म पुरस्कार’ समितीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरेंना दिल्यामुळे नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 04:14 AM2020-08-13T04:14:06+5:302020-08-13T06:45:29+5:30
केंद्र पद्म पुरस्कारांसाठी प्रत्येक राज्यातून नावे कळवते. केंद्राचा गृहविभाग नावांची छाननी करून पद्म पुरस्कारासाठी निवड करतो.
मुंबई : विविध पद्म पुरस्कारांकरिता केंद्र सरकारला शिफारस करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्षपद राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना दिल्याने वादाला तोंड फुटले. आदित्य यांना समितीच्या अध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. मात्र, राजशिष्टाचार मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पद्म पुरस्काराच्या शिफारस समितीचे अध्यक्षपद दिल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितले.
केंद्र पद्म पुरस्कारांसाठी प्रत्येक राज्यातून नावे कळवते. केंद्राचा गृहविभाग नावांची छाननी करून पद्म पुरस्कारासाठी निवड करतो. नावांच्या शिफारशीसाठी एक समिती राज्य स्तरावर असते, राजशिष्टाचार मंत्र्यांकडे त्याचे अध्यक्षपद असते. महाराष्ट्रात १० वर्षांपासून हा प्रघात आहे.
यंदा केंद्र व राज्यात दोन वेगळ्या पक्षांची सरकारे असल्याने काहीतरी नवीनच घडत आहे असे चित्र भासवून राजशिष्टाचार मंत्री कनिष्ठ आहेत, त्या जागी ज्येष्ठ मंत्र्याची नेमणूक अध्यक्ष म्हणून केली पाहिजे, असे विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी म्हटले आहे. भाजपच्या काळात काही वर्षे प्रकाश मेहता, नंतर राम शिंदे राजशिष्टाचार मंत्री होते. त्याआधी सुरेश शेट्टींकडे हा विभाग होता. शेट्टी म्हणाले, मी मंत्री असताना अनेक ज्येष्ठ मंत्री होते; तरीही माझ्याकडे अध्यक्षपद होते. तेव्हा चर्चा झाली नाही. आता राजकारणासाठी ही चर्चा का केली जात आहे, असा सवालही त्यांनी केला.
समितीत बँक घोटाळ्यातील आरोपी : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सुनील केदार यांना समितीत सदस्य म्हणून घेतल्याने नव्या वादाची शक्यता आहे.