मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईसह राज्यात जागा वाटपाची जोरदार रस्सीखेच सुरू आहे. इंडिया आघाडीची नुकतीच जागा वाटपासंदर्भात दिल्लीत बैठक झाली, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपनगरात विधानसभानिहाय भाजपच्या सुपर वॉरियर कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.
राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाचे राजकीय चित्र बदललेले आहे. शिंदे गट, भाजप, अजित पवार गट यांची महायुती विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट यांची इंडिया आघाडी यामध्ये काटे की टक्कर होणार, असे सध्या तरी चित्र आहे.
यांच्या नावांची आहे चर्चा-
उत्तर मुंबईतून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा आहे.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांच्यात थेट लढत होणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
याच जागेवर भाजपसुद्धा प्रयत्नशील आहे.
दक्षिण मध्य मुंबईचे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात उबाठामधून शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या नावाची चर्चा आहे.
यांना तिकीट मिळणार का ?
दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश केलेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांना तिकीट मिळण्याची चर्चा सुरू आहे.
उत्तर मध्य मुंबईतून भाजप विद्यमान खासदार पूनम महाजन यांना परत तिकीट मिळले का?, त्या ऐवजी माजी राज्यमंत्री बाबा सिद्धीकी व माजी मंत्री नसीम खान यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.