गद्दारीची भाषा रामदास कदमांच्या तोंडी हास्यास्पद; किर्तीकरांनी सांगितला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 05:59 PM2023-11-11T17:59:42+5:302023-11-11T18:00:03+5:30

वैफल्यग्रस्त झाल्याने रामदास कदम आदळआपट करत आहेत. रामदास कदम माझ्याबद्दल पक्ष नेतृत्वाच्या मनात आणि जनतेच्या मनात हेतूपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत असा आरोप खासदार गजानन किर्तीकरांनी लावला.

Controversy in Eknath Shinde's Shiv Sena, Gajanan Kirtikar and Ramdas Kadam criticize each other | गद्दारीची भाषा रामदास कदमांच्या तोंडी हास्यास्पद; किर्तीकरांनी सांगितला इतिहास

गद्दारीची भाषा रामदास कदमांच्या तोंडी हास्यास्पद; किर्तीकरांनी सांगितला इतिहास

मुंबई – शहरातील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिवसेनेतील २ ज्येष्ठ नेते आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच रामदास कदमांनी त्यांच्या मुलासाठी या मतदारसंघावर दावा सांगितला. तर गजानन किर्तीकरांनीही त्यावर थेट विरोध दर्शवला. आता रामदास कदम यांनी गजानन किर्तीकरांना पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका असा खोचक सल्ला दिला. त्यावर गजानन किर्तीकरांनीही गद्दारीच्या भाषा रामदास कदमांच्या तोंडी हास्यास्पद असल्याचा टोला लावत कदमांबाबत गौप्यस्फोट केले आहे.

गजानन किर्तीकर म्हणाले की, रामदास कदमांना गद्दारीचा फार मोठा इतिहास आहे. १९९० साली मी जेव्हा मालाड विधानसभेतून निवडणुकीसाठी उभा होतो, त्याचवेळेला रामदास कदम खेडमधून निवडणूक लढवत होते. माझ्या मालाडमधील कार्यकर्ते त्यांनी खेडला नेले आणि मला पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी झाले नाही. मी १० हजार मताधिक्याने विजयी झालो. खेड भरणा नाका ते भोर पुणे शरद पवार यांच्या गाडीत बसून रामदास कदम राष्ट्रवादीतील प्रवेश करण्याबाबत सविस्तर चर्चा करत होते, ते त्यांनी विसरू नये असं किर्तीकरांनी म्हटलं आहे.

त्याचसोबत एवढेच कशाला कांदिवली पूर्व महापालिकेच्या वार्डातून त्यांचा सख्खा भाऊ सदानंद कदम शिवसेना पक्षातून निवडणूक लढवत होते. तेव्हा त्यांना निवडून आणू नका म्हणून सर्व कार्यकर्त्यांना रामदास कदम दमबाजी करत होते. अनंत गीते यांना देखील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पाडण्यासाठी रामदास कदम यांनी भरपूर मेहनत घेतली, परंतु कोकणातील निष्ठावान शिवसैनिक गीतेंच्या पाठिशी उभे राहिल्यामुळे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले असा गौप्यस्फोटही खासदार गजानन किर्तीकर यांनी केला.

दरम्यान, त्यांचा मुलगा सिद्धेश कदम याला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे म्हणून ते विविध मार्गांनी खोट्या बातम्या पसरवून वातावरण गढूळ करण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या दबावतंत्राला शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे थारा देणार नाहीत अशी मला खात्री आहे. त्यामुळेच वैफल्यग्रस्त झाल्याने रामदास कदम आदळआपट करत आहेत. रामदास कदम माझ्याबद्दल पक्ष नेतृत्वाच्या मनात आणि जनतेच्या मनात हेतूपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत, ते थांबवावेत असा इशाराही गजानन किर्तीकर यांनी रामदास कदमांना दिला आहे. तसेच मी शिवसेना पक्षातूनच लोकसभा लढवणार आणि साडे तीन लाख मताधिक्याने जिंकणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले होते रामदास कदम?

गजानन किर्तीकरांनी स्वत: उभे राहावे, तुमचा मुलगा तिकडे, तुम्ही इकडे, मुलासाठी फॉर्म भरून घरी बसू नका. पक्षाशी बेईमानी होणार नाही एवढे पथ्य पाळा. बाकी तुम्हाला विरोध करण्याचे कारण नाही. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. फक्त एका ऑफिसमध्ये बाप-बेटा बसतात, काय करतात हे जनता पाहतेय. मुलगा तिथून उभा राहणार, तुम्ही इथून फक्त फॉर्म भरायचा आणि मुलाला बिनविरोध निवडून द्यायचे असे कटकारस्थान होता कामा नये. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसता कामा नये एवढी तुम्हाला हात जोडून विनंती आहे असा खोचक सल्ला कदमांनी गजानन किर्तीकरांना दिला होता.

Web Title: Controversy in Eknath Shinde's Shiv Sena, Gajanan Kirtikar and Ramdas Kadam criticize each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.