Join us

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी; बैठकीत आमदार अस्लम शेख आक्रमक

By मनोहर कुंभेजकर | Published: January 08, 2024 4:42 PM

पोलीस आयुक्त व पालिका आयुक्त उपस्थित नसल्याच्या मुद्द्यावरुन आमदार अस्लम शेख आक्रमक.

मनोहर कुंभेजकर, मुंबई  :  मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व पोलीस आयुक्त उपस्थित नसल्याच्या मुद्यावरुन मालाड पश्चिमचे कॉंग्रेसचे आमदार अस्लम शेख चांगलेच  आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

 वांद्रे( पूर्व),चेतना कॉलेज येथे उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली जिल्हा नियोजनची बैठक पोलीस आयुक्त व पालिका आयुक्तांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावरुन वादळी ठरली.

आमदार शेख म्हणाले की, मुंबई उपनगरातील विकासकामे व कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या बैठकीला पालिकेचे आयुक्त व पोलीस आयुक्त उपस्थित नसणे हे दुर्देवी आहे. यातून प्रशासन एवढ्या महत्त्वपूर्ण बैठकीला गांभीर्याने घेत नाहीत, हेच सिद्ध होते. आज अमली पदार्थांच्या विळख्यात अडकून मुंबईतील तरुण पिढीचं वर्तमान आणि भविष्य उद्ध्वस्त होत असताना पोलीस आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे या विषयाच्या अनुषंगाने चर्चा होऊ शकली नाही.

सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यासंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सदस्यांना प्राप्त होणारा अनुपालन अहवाल व प्रत्यक्ष वस्तुस्थिती यामध्ये प्रचंड तफावत असते असे त्यांनी निदर्शनास आणले.

मालाड पश्चिम भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी न्यायालयात खटला दाखल करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाला याबाबत जाब विचारत हा खटला मागे घेण्याची मागणी देखील आमदार अस्लम शेख यांनी या बैठकीत केली.

टॅग्स :मुंबईराजकारण