मुंबई - १९९३ बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेननला ७ वर्षापूर्वी मुंबईच्या बडा कब्रिस्तान इथं दफन करण्यात आले होते. मात्र त्याच्या कबरीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. याकूबची कबर मार्बल आणि लायटिंगनं सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यावरून भाजपानं मागील महाविकास आघाडी सरकारला दोषी धरत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, याकूब मेननच्या कबरीच्या सुशोभिकरणासाठी अलिखीत परवानगी महाविकास आघाडी सरकारने दिली. मविआ आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी किती तडजोड केली हे यावरून स्पष्ट झाले आहे. भाजपा या प्रकाराचा तीव्र निषेध करत आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची प्रतिमा खालावली. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सरकारला करण्यात आली आहे.
तसेच याकूबची कबर सुशोभिकरणासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे नावे समोर आणा. हे देशद्रोही कृत्य असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तत्कालीन सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होते. कट्टर हिंदुत्ववादी स्वत:ला म्हणवणारे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी तडजोड का केली? याचं स्पष्टीकरण जनतेला दिले पाहिजे. या प्रकारासाठी सरकारमध्ये कोण कोण समाविष्ट होते ते समोर आले पाहिजे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शिवसेना दाऊदची प्रचारक झालीययाकूब मेनन जिवंत ठेवला पाहिजे ही काँग्रेसनं मांडलेली भूमिका होती. त्यावेळी केंद्रात कुणाचं सरकार होतं? गृहमंत्री कोण होते? याचे उत्तर काँग्रेसनं पहिलं द्यावं. सुप्रीम कोर्टात काँग्रेसनं काय भूमिका मांडली होती? याकूब मेननला जिवंत ठेवा अशी मागणी काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी केली होती. सत्तेत असताना शिवसेना दाऊदची समर्थक होती हे आम्ही पाहिले. शिवसेना आता दाऊदची प्रचारक झाली आहे. पाकिस्तानच्या मदतीने दाऊदनं भारतावर, मुंबईवर हल्ला केला. त्यातला प्रमुख आरोपी याकूब मेनन ज्याला फाशी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झाली. मग त्याच्या कबरीवर सुशोभिकरणाची परवानगी दिली कशी? अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. कब्रिस्तानची जबाबदारी महापालिकेकडे असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदच्या माणसाच्या कबरीचं सुशोभिकरण सुरू आहे. पेग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम सुरू करून पेग्विन सेनेच्या युवा अध्यक्षांनी त्याचे नेतृत्व करावे असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर घणाघात केला आहे.