मीरारोड - भाईंदरच्या धारावी देवी मंदिरात बळी देण्याची प्रथा बंद करण्याची इच्छा बालयोगी सदानंद बाबा व ट्रस्टींची असली तरी पूर्वापार प्रथा असल्याने काही भाविकांच्या विरोधानंतर बळी प्रथा सुरुच राहणार असल्याचा पावित्रा ट्रस्टने घेतलाय. पण मंदिराच्या आवारात बेकायदा चालणारे मद्यपान मात्र बाबांनी सांगितल्याप्रमाणे बंदच राहील, असे ट्रस्टींनी सांगितले.
तारोडी येथील धारावी देवीला नवस म्हणून कोंबडा किंवा बोकड बळी दिला जातो. मंदिराच्या मागेच बळी देऊन तेथेच जेवण बनवले जाते. जेवणासोबत सर्रास बेकायदा मद्यपान मंदिराच्या आवारात केले जाते . पोलीस, पालिकेतील नगरसेवक, अधिकारी - कर्मचारी हेदेखील यामध्ये अनेकदा सहभागी होतात. मद्यपानानंतर निर्माण होणाऱ्या वादातून या भागात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. मटण व मद्यपानासाठी येणाऱ्यांची संख्यादेखील मोठी असल्याचे सांगितले जाते.
मंदिराच्या कलशरोहण सोहळयासाठी सदानंद बाबा येणार म्हणून ट्रस्टने ८ जानेवारीपासून मंदिर आवारात बळी देण्यास बंदी घातली होती. स्वत: बाबांनी देखील अशा ठिकाणी आपण जात नसल्याचे सांगत बळी प्रथा बंद करण्याबाबत विचार करण्यास ट्रस्टी व अन्य संबधितांना सांगत त्यांनी बळी प्रथा बंद करण्याची इच्छा वर्तवली होती . ट्रस्टींनी देखील स्वत:च्या घरचे नवसाचे बळी देणे बंद केले असल्याने बाबांच्या इच्छेनुसार बळी प्रथाच बंद करण्याचा पावित्रा घेतला होता. परंतु मुर्धा, राई, मोर्वा गावांमधून अनेकांनी बळी प्रथा बंद करण्यास विरोध चालवला. त्यामुळे विश्वस्त मंडळानेही घूमजाव करत बळी प्रथा बंद न करण्याची भूमिका घेतली आहे. तर एकवीरा देवी , जीवदानी देवी , वज्रेश्वरी देवी मंदिर परीसरात होणारी बळी प्रथा बंद करण्यात आली आहे. मग धारावी देवी मंदिराच्या आवारात बळी प्रथा, मद्यपान कधी बंद करणार, असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केलाय .
सदानंद बाबांची व ट्रस्टींची पण बळी प्रथा बंद करण्याची इच्छा आहे. पण लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. बळीची जागा हलवण्याचा प्रयत्न आहे. मद्यपान मात्र बंद केलेले आहे. पोलिसांना देखील बेकायदा मद्यपानावर कारवाईबद्दल भेटणार आहोत.रमेश पाटील ( सचीव, धारावी मंदिर ट्रस्ट )
बळी प्रथा लोकांच्या भावना समजुन न घेता बंद करणे चुकीचे आहे. ट्रस्टने बळी साठी मंदिरा पासुन लांब जागा उपलब्ध केली पाहिजे होती. मद्यपान बंदी मात्र झालीच पाहिजे त्यासाठी आम्ही ट्रस्ट सोबत आहोत.नंदकुमार पाटील ( अध्यक्ष, गावपंच मंडळ - मुर्धा )
मंदिरातील बळी प्रथा व मद्यपान बंदीची बाबांची इच्छा योग्यच आहे. बळी व मद्यपानावर होणारा खर्च टाळुन उलट समाजातील गरीब, गरजु मुली - मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या विवाहासाठी केला गेला पाहिजे.गजानन भोईर (प्रदेश सरचीटणीस, आगरी सेना) - धारावी