मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभारावरून भाजपाने वारंवार शिवसेनेवर तोफ डागली. गुरुवारी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपावरच सुधार समितीच्या माध्यमातून २ लाख कोटींचा घपला केल्याचा आरोप केला. पालिकेतील सुधार समिती आणि शिक्षण समिती सातत्याने भाजपाकडे राहिली आहे. सुधार समितीच्या माध्यमातून जनतेसाठी राखीव भूखंडांवरील आरक्षण उठविण्याचे व ते बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम भाजपाने केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवाब मलिक म्हणाले की, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे सुधार समितीचे चॅम्पियन आहेत. नगरसेवक असताना त्यांनी कधीच सुधार समिती सोडली नाही. आताही या समितीची सूत्रे त्यांच्याकडेचआहेत. काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांच्या वांद्रे मतदारसंघात एल्को मार्केटसमोरचा हिल रोड येथील ४ हजार चौरस मीटरचा भूखंड आरक्षणमुक्त करण्यात आला. यासाठी सुधार समितीच्या माध्यमातून ४० कोटींचा गैरव्यवहार झाला असून, त्याचे मुख्य सूत्रधार आशिष शेलार हेच आहेत. अशा प्रकारचे अनेक गैरव्यवहार त्यांनी सुधार समितीच्या माध्यमातून केले असून, पुढील पत्रकार परिषदेत त्याची माहिती जाहीर करू, असे नवाब मलिक यांनी जाहीर केले. स्वत: घोटाळेबाज असणाऱ्या आशिष शेलार यांनी इतरांसमोर पारदर्शक कारभाराची अट घालणे हास्यास्पद आहे. गेली २२ वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. पालिकेतील प्रत्येक विभागात घोटाळा झाला आहे. मात्र, प्रत्येक समितीत आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे या सर्व घोटाळ्यांत भाजपा बरोबरीचा वाटेकरी असल्याचा आरोप मलिक यांनी केला. (प्रतिनिधी)भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांच्या उलट्या बोंबा - आशिष शेलार यांचा पलटवार च्नवाब मलिक यांनी वांद्र्यातील ज्या भूखंडाचा नकाशा दाखविला आहे त्याचे आरक्षण आघाडी सरकारच्या काळात बदलण्यात आले. तेंव्हा नगरविकास खाते काँग्रेसकडे होते आणि वांद्र्याचे स्थानिक आमदारही काँग्रेसचेच होते; शिवाय तेंव्हाही आणि आताही येथील नगरसेवक काँग्रेसचेच आहेत. या आरक्षण बदलाशी भाजपाचा अथवा वैयक्तिक माझा कोणताही संबंध नाही, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. च्या प्रकरणी माझे शिफारसपत्र, बैठकीचे इतिवृत्तांत किंवा तत्सम कोणताही पुरावा न देताच नवाब मलिक आरोप करीत आहेत. आघाडीच्या काळातील भूखंड भ्रष्टाचाराची माहिती मलिक आता उघड करीत आहेत. च्मलिक यांनी इतके दिवस ही माहिती लपवून ठेवली त्यामुळे त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे केल्याचे शेलार यांनी सांगितले. च्शिवाय, कोणाच्या काळात नेमके हे आरक्षण बदलले गेले याची चौकशी करावी आणि माहिती उघड करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असेही शेलार यांनी सांगितले.
भाजपा-राष्ट्रवादीत भ्रष्टाचारावरून वादावादी
By admin | Published: January 13, 2017 7:08 AM