वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 05:32 AM2024-06-17T05:32:13+5:302024-06-17T09:44:12+5:30
अपक्ष उमेदवार भरत शाह आणि मोहन अरोरा यांच्या तक्रारीवरून याप्रकरणात वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर व निवडणूक कर्मचारी दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे रवींद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी झाल्यानंतर विरोधकांनी सवाल उपस्थित केले. वायकर यांच्या मेहुण्याने मतमोजणीवेळी मोबाइलचा वापर करून ओटीपीद्वारे ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप विरोधकांनी केला.
अपक्ष उमेदवार भरत शाह आणि मोहन अरोरा यांच्या तक्रारीवरून याप्रकरणात वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर व निवडणूक कर्मचारी दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या पार्श्वभूमीवर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत ईव्हीएम अनलॉक करण्यास ओटीपीची आवश्यकता लागत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. सूर्यवंशी यांनी सांगितले की, ईव्हीएम यंत्र कशाशीही जोडले जात नाही. निवडणूक कर्मचारी गुरव यांचा तो स्वत:चा मोबाइल आहे. त्यांना तो ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. आम्हीही याचा अंतर्गत तपास करणार आहोत. नायब तहसीलदारांनी गुरव यांच्याविरोधात पोलिस तक्रार केली असून गुरव यांना निलंबित करण्यात आले आहे.
फेरमतमोजणीत काय झाले?
- ४ जून रोजी रात्री ७:५३ मिनिटांनी रवींद्र वायकर हे टपाल मतमोजणीत ४८ मतांनी विजयी झाल्याचे घोषित केले. परंतु पराभूत उमेदवार कीर्तिकर यांचा फेरमतमोजणीचा अर्ज हा रात्री ८:०६ मिनिटांनी विहित वेळेनंतर आल्याने त्यांचा अर्ज नियमानुसार ग्राह्य धरण्यात आला नाही.
- निकाल जाहीर केल्यानंतर विहीत दोन मिनिटांमध्ये हरकत घ्यायला हवी होती, असे सूर्यवंशी म्हणाल्या.
- टपाल मतांमध्ये बाद झालेल्या १११ मतांचे फेरतपासणी करण्यात आली. त्यात काही तथ्य आढळले नाही व वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.