Join us

"मजारीच्या जागेतून दूध निघायचं...पाणीही गोड होतं; आमच्या बापजाद्यापासून ही जागा"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 9:23 AM

माहिमच्या मखदूम बाबा दर्गाच्या मागे समुद्रात ही जागा असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.

मुंबई - शहरातील माहिम भागात समुद्रात असलेल्या कथित मजारीवरून आता रणकंदन पेटण्याची चिन्हे आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात माहिममध्ये अनाधिकृत बांधकाम होत असल्याचा दावा करत थेट ड्रोन फुटेज सभेत दाखवले. हे फुटेज दाखवल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका, सरकार आणि पोलीस प्रशासनाला इशारा देत महिनाभरात याठिकाणच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाही तर त्याचशेजारी मोठे गणपती मंदिर बांधू असा इशारा दिला. 

माहिमच्या मखदूम बाबा दर्गाच्या मागे समुद्रात ही जागा असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पोलिसांनी सतर्कता म्हणून बंदोबस्त वाढवला आहे. त्याचसोबत घटनास्थळाचे मॅपिंग करण्याचं काम संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे. मात्र याठिकाणी येणाऱ्या भाविकांनी वेगळाच दावा केला आहे. एका स्थानिक महिलेच्या म्हणण्यानुसार, मी २००४ पासून इथं येते. २० वर्ष झाले. अल्लाहच्या मेहरबानीने सर्वकाही ठीक होत आहे. २००५ मध्ये याठिकाणी पाणी गोड झाल्याचं बोलले जाते. त्याचसोबत येथे जमिनीतून दूध यायचे. पण लोकांची नियत असेल तशी बरकत होईल. आज जे मजारीवर दूध चढवले जाते ते पूर्वी जमिनीतून यायचे. आता दूध येत नाही असं महिलेने म्हटलं. 

तर मी लहानपणापासून इथं येतोय. आजतागायत येथे काही बांधकाम झाले नाही. आहे तसेच आहे. आमच्या बापजाद्याच्या जमान्यापासून लोक इथे येतात. जसे आधी होते तसेच आहे. समुद्रात भरती येते तेव्हा पूर्णपणे बंद होते. पाणी उतरल्यानंतर ही जागा दिसते. राज ठाकरे यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. त्यांनाही माहिती असेल. ते माहिममध्ये राहतात. आमच्या बापजाद्यांपासून ही जागा आहे असा दावा एका भाविकाने केला. 

प्रशासनाची कार्यवाही, पोलीस बंदोबस्तराज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन आणि महापालिका यांच्याकडून सदर जागेची पाहणी करण्यात आली. याठिकाणी मेरिटाईम बोर्डाकडून मॅपिंगही करण्यात आले असून जेसीबी आणि हातोडा घेऊन कर्मचारी दाखल झाले. याठिकाणाचे अनाधिकृत बांधकामावर तोडक कारवाई होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :राज ठाकरे