राज ठाकरे यांच्या बनावट पत्रावरून वरळीत वाद; मनसैनिकांची शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 06:42 AM2024-11-21T06:42:22+5:302024-11-21T06:44:35+5:30
Raj Thackeray's fake letter: शिंदेसेनेचे माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांनी राज ठाकरे यांच्या नावाचे एक बनावट पत्र व्हायरल केले.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीमध्ये शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे फेक पत्र व्हायरल करणाऱ्या कार्यकर्त्याला मनसैनिकांनी मारहाण केली आहे. या पत्रावर राज ठाकरे यांची बनावट सही आहे. त्यामध्ये त्यांनी शिंदेसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मनसेने हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे.
शिंदेसेनेचे माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांनी राज ठाकरे यांच्या नावाचे एक बनावट पत्र व्हायरल केले. यामध्ये शिवडीमध्ये महायुतीने मनसे उमेदवाराच्या विरोधात उमेदवार न देता मनसेचा सन्मान केला आहे. त्यामळे हिंदू मतांचे विभाजन रोखण्यासाठी वरळीमध्ये धनुष्यबाणाला समर्थन देणार आहे, असे म्हटले आहे.
राजेश कुसळे हे पत्र घेऊन मतदारसंघात फिरत असताना मनसैनिकांनी त्यांना पकडून याचा जाब विचारला. यावेळी कुसळे यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांची आणि मनसैनिकांची बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले.
कुसळे विरोधात गुन्हा दाखल
मनसेचे उपविभाग सचिव अशोक पाटकर यांनी या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्याआधारे पोलिसांनी कुसळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिंदेसेना आणि उद्धवसेनेत वाद
दरम्यान, गांधीनगर येथे शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही टेबल लावण्यावरून वाद झाला. इतक्यात शिंदेसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा तेथे आले. त्यांनी पोलिसांच्या मध्यस्थीने कार्यकर्त्यांची समजूत काढून हा वाद मिटविला.
२३ तारखेला बोलेन - आदित्य
मारहाणीच्या या घटनेवर बोलण्यास आ.आदित्य ठाकरे यांनी नकार दिला. लोक सूज्ञ आहेत. ते योग्य ठिकाणी मतदान करतील. आज काही बोलणार नाही. आता जे काही बोलायचे आहे, ते २३ तारखेला बोलेन, असे ते म्हणाले.
निवडून येणे सोडा, पण ज्यांना मतं मिळण्याचा विश्वास नसतो, तेच अशा गोष्टी करतात. मी असा कोणताही पाठिंबा शिंदेसेनेला दिलेला नाही. -राज ठाकरे, मनसे अध्यक्ष.