Join us  

रायगडावरील शिवपुण्यतिथी कार्यक्रमावरून वादंग

By admin | Published: April 06, 2017 6:04 PM

शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर आयोजित कार्यक्रमामुळे नव्या वादाला सुरूवात झाली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 6  : शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर आयोजित कार्यक्रमामुळे नव्या वादाला सुरूवात झाली आहे. पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने आयोजित कार्यक्रमाला १ हजार ढोलांची सलामी देण्याचे आवाहन करणारी पोस्ट व्हायरल झाली आहे. मात्र असा कोणताही कार्यक्रम होणार नसल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.रायगडावर १० व ११ एप्रिल रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंदीया यांची प्रमुख उपस्थिती असेल. याशिवाय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, रायगडचे पालक मंत्री प्रकाश महेता यांच्यासह स्थानिक महापौर, उपमहापौर आणि अनेक मान्यवर उपस्थिती दर्शवतील. यंदा कार्यक्रमाचे १२२ वे वर्ष असून ढोल बडवण्याचा कोणताही कार्यक्रम यावेळी होणार नसल्याचेही कदम।यांनी स्पष्ट केले. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये अद्वैत चव्हाण नामक व्यक्तीचा संपर्क क्रमांक देऊन ढोल वादनाच्या कार्यक्रमात नाव नोंदणी करून सामील होण्याचे आवाहन केले आहे. यावर चव्हाण हे मंडळाचे सदस्य नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर मात्र पुण्यतिथीला आयेजित ढोल वादनाच्या कार्यक्रमाला कडाडून विरोध होत आहे. सह्याद्री प्रतिष्ठानने यासंदर्भात निषेध व्यक्त करत कार्यक्रम रद्द करण्याची।मागणी केली आहे.