मुंबई : महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या मानखुर्द देवनार येथील प्रचार फेरी दरम्यान काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली. कोटेचा यांनी विरोधकांवर टीका करत देवनार पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी देवनार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सोमवारी सायंकाळी पाच ते साडे सातच्या दरम्यान मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघात कोटेचा यांच्या प्रचार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथील गौतम नगर परिसरात प्रचार यात्रा संपवून कोटेचा यांचे भाषण सुरू असतानाच, शौचालयाच्या मागच्या बाजूने काही समाजकंटकांनी त्यांच्या दिशेने दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. यामध्ये दोन कार्यकर्ते जखमी झाले आहे. याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांचे तेथील कार्यकर्ते डॉ. सतीश तिडके यांनी सांगितले.
कोटेचा यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत, तिसऱ्यांदा या भागात दगडफेक करण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये निहारिका खोंदले यांना दगड लागला. पराभवाच्या भीती पोटी महिलांवर हल्ले करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तपास सुरू...दगडफेक नसून विटेचा तुकडा रॅलीच्या दिशेने आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत तक्रार नोंदवून घेत आहोत. त्यानुसार, गुन्हा नोंदविण्यात येईल. याप्रकरणी अधिक चौकशी करत असल्याचे पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी सांगितले.