पालिका प्रशासनाची तरतूद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहानग्यांना अधिक धोका असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेच्यावतीने लहानग्या रुग्णांसाठी कोविड केंद्राची तरतूद केली आहे, मात्र या कोविड केंद्रांमध्ये लहानगे रुग्ण एकटे राहू शकत नाहीत. त्यामुळे लहानग्या रुग्णांसोबत पालकांनाही राहण्याची सोय करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
बाधित मुलासोबत राहता येत नाही, तेव्हा मूल एकटे रुग्णालयात कसे राहील, मुलाची नीट काळजी घेतली जाईल ना, अशा अनेक शंका पालकांच्या मनात येत असतात. अशा स्थितीमध्ये पालकांनाही मुलावर लक्ष ठेवता यावे, त्याची भेट घेता यावी यासाठी पालिकेच्या मोठ्या कोरोना रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विभाग उभारण्यात येत आहेत.
४४५ स्वतंत्र विभागांची निर्मिती
लहानग्या रुग्णांच्या उपचारांकरिता पालिकेने १५१० प्राणवायू खाटा आणि २२२ खाटांचा अतिदक्षता विभाग तयार केला आहे. मुलासोबत आई किंवा घरातील अन्य व्यक्ती बाधित झालेली असेल तर एकत्र ठेवण्यासाठी जवळपास ३७९ खाटांची व्यवस्था केलेली आहे. परंतु, घरात पालक बाधित नाहीत आणि मुलाला कोरोनाची बाधा झाली आहे, अशास्थितीत पालकांना मुलासोबत ठेवता येत नाही. तेव्हा अशा पालकांना दुरून मुलावर लक्ष ठेवता येईल, आवश्यकता भासल्यास सर्व सुरक्षेसह विभागात जाता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी ४४५ स्वतंत्र विभाग उभारण्यात येणार आहेत. २२२ खाटांचा अतिदक्षता विभागही बालकांसाठी तयार करण्यात येणार आहे.