मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत आता ग्राहकांना बँकींग सुविधेचा लाभ घेता येणार आहे. बँकचे ‘व्यावसायिक प्रतिनिधी’ म्हणून या दुकानदारांना काम करता येणार आहे. पॉस मशिनच्या माध्यमातून बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे, पैसे काढणे आणि इतर मुल्य वर्धित बँकींग सेवा ग्राहकांना मिळणार आहेत. शिधावाटप दुकानदारांमार्फत बँकीग सेवा पुरविण्याच्या या उपक्रमाचे मंगळवारी उद्घाटन होणार आहे.राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधत मंगळवार, २२ जानेवारी रोजी रवींद्र नाट्य मंदिरात शिधावाटत दुकानदारांमार्फत बँकींग सेवा तसेच ग्राहक जागृती संदर्भातील प्रदर्शनाचे व ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सार्वजनिक वितरण प्रणालीतील झालेले नवीन बदल, अन्नभेसळ रोखण्यासाठी केलेले विविध उपक्रम, नियमात आणि अंमलबजावणीमध्ये केलेले ग्राहक हिताचे बदल, वैधमापन शास्त्र कायदा अंमलबजावणीतील बदल, राज्य तक्रार निवारण आणि कायद्यातील नवे बदल आदी विषयांवर तज्ज्ञांद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
स्वस्त धान्य दुकानदार देणार बँकिंगची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 5:26 AM