मुंबई : लोअर परळ पुलावरील दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेली डिलाईल रोड परिसराबाजूकडील मार्गिका स्थानिकांचा टोकाचा विरोध पत्करल्यानंतर गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्यात आली. मात्र सुरू झालेल्या मार्गिकेवर पदपथ नसल्याने येथून जीव धोक्यात घालून लहानग्यांसह पालक, ज्येष्ठ नागरिक रस्त्याच्या कडेने ये-जा करतात. याखेरीज, पूर्वी या पुलावरील बेस्टचा बसथांबाही आता हटविल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होतेय. त्यामुळे आता या पुलावरून ये-जा करण्यासाठी जीव धोक्यातच घालायचा का, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
सामान्यांच्या खिशाला फटका -बेस्ट बसची सेवा सुरू न केल्याने टॅक्सी केल्यास डिलाईड रोड ते वरळी नाका या प्रवासाचे भाडे ३५-४० रुपये होते, त्यामुळे पुलाची ही मार्गिका सुरू होऊनही सामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. - सारंग चव्हाण, कर्मचारी