ठाणे : कार्ला एकवीरा देवीची चैत्री यात्रा आणि पालखी सोहळा सप्तमी चैत्र शुद्ध २६ मार्चला होणार आहे. तसेच अष्टमीला २७ मार्च रोजी देवीच्या तेलवणाचा व मानाचा कार्यक्रम गडावर होणार आहे. या यात्रेदरम्यान भाविकांना सर्व सोयीसुविधा पुरविणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी दिली. गड परिसरात तीन दिवस दारूबंदी राहणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.यात्रेदरम्यान गडावर आणि गड परिसरात भाविकांच्या सुविधांसंदर्भात आढावा घेण्यासाठी राव यांच्या अध्यक्षतेखाली श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी लोणावळा येथील एमटीडीसी येथे पार पडली. भाविकांना सहजतेने दर्शन घेता यावे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अधिकाऱ्यांना त्यांनी या वेळी सूचना केल्या. यात्रा काळात मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणली जाते. त्यासाठी गड परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारूबंदी जाहीर करण्यात आली. तसेच पशुहत्येस बंदीबरोबरच गडावर आणि मंदिर परिसरात फटाके आणि बॅण्ड वाजविण्यावरही बंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. महाराष्ट्र हे उत्सवप्रेमी राज्य आहे. पण, गाफील राहिले तर मांढरदेवीसारख्या दुर्घटना घडतात. त्यामुळे गाफील राहू नका, असेही त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना बजावले. एकवीरा देवस्थान ट्रस्ट आणि पोलीस यांच्यात समन्वय केंद्र राहील, असे पुण्याचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अग्निशमन दल आणि डॉक्टर यात्रेदरम्यान, गडावर पिण्याचे मुबलक पाणी, आरोग्य केंद्र, अखंडित विद्युतपुरवठा, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, रस्त्यांची डागडुजी, पर्यायी रस्ता, लोणावळा ते कार्ला जादा एसटी बसची व्यवस्था, भाविकांना सूचना देण्यासाठी पोलीस केंद्र तसेच अतिरिक्त कामगार नेमून गड परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. भाविकांना दर्शनासाठी पर्यायी उड्डाणपूलही उभारण्यात येणार आहे. गड पायथ्याजवळ संरक्षण चौकी, ६ सीसीटीव्ही कॅमेरे आणि डॉक्टरांचे पथक आदींची पूर्तता विश्वस्त मंडळाच्या वतीने केल्याची माहिती अध्यक्ष अनंत तरे यांनी दिली.
एकवीरा यात्रेसाठी सुविधा देणार
By admin | Published: March 23, 2015 1:06 AM