राज्यातील मराठी शाळांचे महासंमेलन
By admin | Published: December 3, 2014 02:23 AM2014-12-03T02:23:24+5:302014-12-03T02:23:24+5:30
मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने ‘गिरणगावातील मराठी शाळांची स्थिती’ या विषयावर परळ येथील शिरोडकर शाळेत निर्धार बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई : मराठी पालकांना आणि मराठी शाळांचे संस्थाचालक, शिक्षक यांना जागृत करण्यासाठी मराठी माध्यमात शिकणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, संस्थाचालक यांचे राज्य पातळीवर एक महासंमेलन भरवीत असल्याची घोषणा निर्धार बैठकीत करण्यात आली. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने ‘गिरणगावातील मराठी शाळांची स्थिती’ या विषयावर परळ येथील शिरोडकर शाळेत निर्धार बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.
अभ्यास केंद्राच्या मराठी शाळा या कृतीगटाच्या प्रमुख वीणा सानेकर यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले. या बैठकीत सर्व सोयी, सवलती उपलब्ध करून दिल्यानंतरही मराठी पालक मराठी शाळांकडे वळत नाहीत. तर शाळेत नवनवीन उपक्रमांबरोबरच पालकांचेही समुपदेशन केले तर पटसंख्या टिकविता येते हे उपक्रमांसहित काही शाळांच्या प्रतिनिधींनी सांगितले. अनुदानाचे प्रश्न, आठवीपर्यंत पास इत्यादी शासनाची काही धोरणेदेखील मराठी शाळा बंद पडण्यास कारणीभूत आहेत, असे कित्येक शाळांच्या संस्थाचालकांनी सांगितले. यानंतर मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी मराठी शाळांच्या सक्षमीकरणाकरिता कृती कार्यक्रम जाहीर केला.
तसेच या कृती कार्यक्रमातील उपक्रम राबविण्यासाठी विभागवार समित्या स्थापन करून दर दोन महिन्यांनी बैठकांचे आयोजन करण्याचेही या निर्धार बैठकीमध्ये ठरले. (प्रतिनिधी)