विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरणार; राज्य सरकार नवाब मलिकांच्या पाठीशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 05:52 AM2022-03-02T05:52:49+5:302022-03-02T05:54:45+5:30

नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही, तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे.

convention of the legislature will be stormy thackeray govt give support nawab malik | विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरणार; राज्य सरकार नवाब मलिकांच्या पाठीशी 

विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरणार; राज्य सरकार नवाब मलिकांच्या पाठीशी 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य विधिमंडळाचे गुरुवारपासून सुरू होत असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारपर्यंत घेतला नाही, तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत दिला. मलिक यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपच्या मागणीसमोर महाविकास आघाडी झुकणार नाही, असे ठणकावले. 

राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होईल. राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प ११ मार्चला विधिमंडळात सादर होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी १० मार्चला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. त्याचे राजकीय परिणाम राज्याच्या राजकारणावर होऊ शकतात. 

विधानसभा अध्यक्षपदाची निवड या अधिवेशनात होत असून त्याबाबत कमालीची उत्सुकता आहे. ही निवड खुल्या मतदानाने करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवरून सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष पुन्हा एकदा घडण्याची शक्यता आहे. १० मार्चनंतर राज्यात बदल होतील असे म्हणत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये खांदेपालट होतील, असे संकेत दिले आहेत.

राज्यावरील कर्जाचा वाढता डोंगर, कोरोनामुळे सरकारच्या उत्पन्नात झालेली घट, विकासकामांना लागलेली कात्री या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा करतात, या बाबतही उत्सुकता असेल.

घोटाळ्यांविरुद्ध बॉम्ब फोडण्याची तयारी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडी सरकारमधील कथित भ्रष्टाचाराची दोन मोठी प्रकरणे काढतील, अशी शक्यता आहे. त्याचवेळी फडणवीस सरकारच्या काळातील आयटीसह काही कथित घोटाळ्यांचा तपशील देत महाविकास आघाडी सरकारकडूनही हल्लाबोल होईल, असे मानले जात आहे.

चहापानावर विरोधकांचा बहिष्कार?

अधिवेशनासाठी रणनीती निश्चित करण्याकरिता विरोधी पक्षाची बैठक बुधवारी दुपारी होणार आहे. राज्य सरकार आणि विरोधी पक्ष भाजपमधील सध्याचे ताणलेले संबंध लक्षात घेता विरोधक मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकतील, अशी शक्यता आहे.

Web Title: convention of the legislature will be stormy thackeray govt give support nawab malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.