मुंबई : देशभरात सध्या वादाचा मुद्दा ठरलेल्या बीबीसीच्या माहितीपटाविरोधात शनिवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या माहितीपटाचा आणि बीबीसीचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठराव मांडला. हा माहितीपट न्यायव्यवस्थेला बदनाम करणारा असून, धार्मिक फूट निर्माण करण्याचा प्रयत्न या माहितीपटाच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. हा ठराव त्यांनी मांडला तेव्हा विरोधकांनी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याच्या मुद्यावरून सभात्याग केला होता.
तत्पूर्वी भातखळकर म्हणाले, की १७ फेब्रुवारी २०२३ रोजी बीबीसीने पंतप्रधान मोदी आणि भारतीय प्रजासत्ताकावर हल्ला करण्याच्या एकमेव उद्देशाने हा माहितीपट दाखविला. गुजरातेत २००२ मध्ये घडलेल्या घटनांचे खोटे व काल्पनिक चित्रण करून भारताच्या न्यायिक संस्थांना तोडजोडीच्या संस्था म्हणून रंगवले आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा ठराव मतदानाला टाकला व तो आवाजी मतदानाने मंजूर झाला.