हिवाळी अधिवेशन केवळ 5 दिवसांचं, फडणवीसांची मोठी नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 11:56 AM2021-11-29T11:56:27+5:302021-11-29T12:08:44+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनासंदर्भात माहिती देत सरकारच्या अधिवेशन धोरणावर टीका केली आहे.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश यावेळी मुंबईतच होणार आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. दरम्यान, हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न होणे हे निंदनीय आहे. नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हायला पाहिजे, असा नियम आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत नाराजी दर्शवत मार्च महिन्यातील अधिवेशन नागपुरात घेण्यात यावं, अशी मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनासंदर्भात माहिती देत सरकारच्या अधिवेशन धोरणावर टीका केली आहे. राज्य सरकार अधिवेशनापासून दूर पळत आहेत, अधिवेशन केवळ 4 ते 5 दिवसांचं घेण्यात येणार आहे. पहिला दिवस केवळ शोक प्रस्तावात जातो, त्यामुळे यंदाचं अधिवेशनही केवळ 4 दिवसांचं आहे. आमची मागणी होती, अधिवेशन वाढविण्यात यावा. मात्र, सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यास नकार दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, तारांकीत प्रश्नांवर गेल्या 2 वर्षात एकदाही उत्तर देण्यात आलं नाही, लक्षवेधीलाही उत्तर मिळत नाही. त्यामुळे, सरकारने सगळी आयुधं गोठविण्याचं काम केलंय. दरम्यान, माझ्या मागणीनंतर अधिवेशनापूर्वी तारांकीत प्रश्नांची उत्तरं देण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
Live | Media interaction after attending the BAC Meeting for #WinterSession at Vidhan Bhavan, Mumbai
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2021
हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात कामकाज सल्लागार समिती बैठकीनंतर माध्यमांशी संवाद.. https://t.co/epXe7uXQkM
राज्य सरकारची भूमिका अधिवेशन टाळण्याची दिसून येते. विरोधकांच्या प्रश्नांची तोंड द्यायची तयारी सत्ताधिकाऱ्यांची नाही. गेल्या 2 वर्षांपासून विदर्भात एकही अधिवेशन झालं नाही. त्यामुळे, विदर्भातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून आपली फडवणूक होतेय, अशी भावना विदर्भातील नागरिकांची बनली आहे. त्यामुळे, मार्च महिन्यातील अधिवेशन नागपूरला घ्यावं, अशी मागणी आम्ही केलीय. त्यावर, मार्च महिन्यात अधिवेशन नागपुरात कसं घेता येईल, यासंदर्भात विचार करू, असं सरकारकडून सांगण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.
हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार
कोरोनाची येऊ घातलेली संभाव्य तिसरी लाट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या तीन कारणास्तव राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडलं आहे. दरम्यान आता 20 ते 25 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. हिवाळी अधिवेशन हे प्रथा आणि परंपरेनुसार दरवर्षी नागपूरला होतं, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर झालेल्या शस्त्रक्रियेच्या कारणास्तव ते मुंबईत घेण्यात येत आहे.